आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात जॅपलूप अश्वक्रीडा स्पर्धेला थाटात प्रारंभ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - जॅपलूप इक्वेस्टेरियन सेंटरतर्फे आयोजित अश्वक्रीडा स्पर्धेस शुक्रवारी प्रारंभ झाला. स्पर्धेतील सर्वात लहान अश्वरोहक ठरलेल्या इंदूरच्या सातवर्षीय बलराजसिंग मनजितसिंग भाटिया याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पहिल्याच दिवशी त्याने पोल बेडिंग प्रकारात कांस्यपदक मिळवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गानजीकच्या 19 एकर स्टड फार्मवर ही स्पर्धा तीन दिवस चालणार आहे. स्पर्धेत शो जंपिंग, ड्रेसाज, पोल बेडिंग आदी क्रीडाप्रकार खेळवले जाणार आहेत. पुणे, मुंबई व इंदूर येथून शंभर अश्वरोहकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला.

स्पर्धेच्या आयोजक लॉरेन मोरे यांनी सांगितले, ‘अश्वारोहणाला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून स्पर्धा घेतल्या जात आहेत. यंदा सात वर्षांच्या बलराजसिंगपासून ते 40 वर्षांपर्यंतचे शंभर स्पर्धक सहभागी झाले आहेत. विविध प्रकारांतील गुणांच्या कामगिरीवर अंतिम विजेत्याची निवड केली जाईल.’ इंदूर येथून आलेले कॅबॅलस रायडिंग स्कूलचे प्रशिक्षक अवध मथरानी म्हणाले की, धार्मिक अरोरा (16), श्रेय मदन (16), सागर शुक्ला (15), बलराजसिंग भाटिया (7), विघ्नेश राव (20) आणि करणसिंग (16) हे सहा अश्वरोहक स्पर्धेत आपले कौशल्य दाखवणार आहेत.

पहिल्याच दिवशी बलजितने जिंकलेले कांस्यपदक हे खास आकर्षण ठरले. त्याने पोल बेडिंग प्रकारात ही उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली. निष्णात अश्वरोहकाप्रमाणे त्याने यश मिळवले.

बलराजसिंगची आकर्षक कामगिरी - साडेतीन फूट उंच असलेला बलराजसिंग साडेपाच फूट उंचीच्या घोड्यावर स्वार होऊन आला. सर्वांची नजर त्याच्यावर खिळली. गेल्या दहा महिन्यांपासून हे सात वर्षांचे बालक इंदूर येथे अश्वारोहणाचे प्रशिक्षण घेत आहे. ‘इतक्या लहान वयातही बलराजचे अश्वारोहणाचे कौशल्य लक्षणीय आहे. त्याची आवड लक्षात घेऊनच त्याला प्रोत्साहन देण्याचे काम आम्ही करीत आहोत.तो यामध्ये तरबेज व्हावा,यासाठी सर्व जण मार्गदर्शन करतात. भविष्यात त्याने राष्ट्रीय स्पर्धेत आपला दबदबा निर्माण करावा अशी आमची इच्छा आहे,’ असे त्याची आई पुनीत भाटिया म्हणाल्या.