आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jitu Roy Win Gold Medal In Shooting, Latest News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आशियाई स्‍पर्धा : नेमबाजीमध्‍ये जितू रॉयचा सुवर्णवेध, भारताचे युवा नेमबाज चमकले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन - युवा नेमबाज जितू रॉय आणि श्वेता चौधरीने शनिवारी १७ व्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पदकाचा वेध घेऊन भारतीय संघाला आपल्या ७५ मेडलच्या मोहिमेला दमदार सुरुवात करून दिली. जितूने पहिल्याच दिवशी भारताच्या नावे सुवर्णपदकाची नोंद केली. त्याने पुरुषांच्या ५० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाचा वेध घेतला. श्वेताने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदकाची कमाई केली.
यंदाच्या सत्रातील जितूचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले. यापूर्वी नुकत्याच झालेल्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले होते. याशिवाय त्याने ग्रेनाडामधील वर्ल्ड नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदकाची कमाई केली. तसेच आगामी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील आपला प्रवेश निश्चित केला. त्याने जूनपासून आजतागायत झालेल्या सहा स्पर्धांच्या फायनलमध्येही धडक मारली होती.

श्वेताने पटकावले तिसरे स्थान : जागतिक क्रमवारीत ४६ व्या स्थानी असलेल्या श्वेताने १० मीटर एअर पिस्‍तूलच्या अंतिम फेरीत फेरीत १७६.४ गुण मिळवून कांस्यपदक निश्चित केले. भारताचे स्पर्धेतीलहे पहिले कांस्यपदक ठरले. दक्षिण कोरियाच्या जुंग जिहाईने २०१.३ गुणांसह रौप्यपदकावर नाव कोरले. तसेच चीनची झांग मेंग्युआन २०२.२ गुणांसह सुवर्णपदकाची मानकरी ठरली.

सांघिक गटात भारत पाचव्या स्थानी : १० मीटर एअर रायफलच्या सांघिक गटात भारताने पाचवे स्थान गाठले. हिना , मलाईका व श्वेता चौधरीने ११३४ गुणांची कमाई करताना भारताला पाचवे स्थान मिळवून दिले.

सुखेन डे पाचव्या स्थानी : वेटलिफ्टिंगमध्ये ग्लासगो राष्ट्रकुल चॅम्पियन सुखेन डेला २४२ किलो वजन उचलून पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले. त्याच्याकडून पदकाची आशा होती. महिला गटात मीराबाई चानूने एकूण १७१ किलो वजन उचलून नववे स्थान गाठले. संजिता चानुने १० वे स्थान पटकावले.

०२पदकांसह भारत सहाव्या स्थानी
१३ पदकांसह द.कोरिया अव्वल
०१ सुवर्ण भारताला नेमबाजीत

हिना सिद्धूचा नेम हुकला
जगातील माजी नंबर वन हिना सिद्धूला स्पर्धेच्या पहिल्या दिवशी समाधानकारक कामगिरी करता आली नाही. तिचा १० मीटर एअर रायफलची अंतिम फेरी गाठण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. तिला ३७८ गुणांसह पात्रता फेरीत १३ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. याशिवाय १६ वर्षीय मलाईकाने ३७३ गुणांसह २४ वे स्थान गाठले.

ज्युदो : सुशीला, कल्पना बाहेर
भारताची युवा ज्युदोपटू सुशीलादेवी, नवज्‍योत चाना व कल्पना देवीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या सुशीलादेवीला ४८ किलो वजन गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या एमीने पराभूत केले. तसेच कल्पनाला ५२ किलो वजन गटात चीनच्या गिनानने हरवले. मंगोलियाच्या बाल्ड बातारने भारताच्या नवज्‍योत चानाचा पराभव केला. या पराभवामूळे भारताचे खेळाडू बाहेर पडले.

दीपिका, जोश्ना उपांत्यपूर्व फेरीत
भारताची स्टार खेळाडू दीपिका पल्लिकल आणि जोश्ना चिनप्पाने दमदार सुरुवात करताना स्क्वॅशच्या महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. तसेच पुरुष गटात सौरभने अंतिम आठमध्ये धडक मारली. जागतिक क्रमवारीत २१ व्या स्थानी असलेल्या जोश्ना चिनप्पाने यजमान दक्षिण कोरियाच्या सोंग सुनमीला पराभूत केले. तिने ११-९, ११-७, ११-७ अशा फरकाने सामना जिंकला. दीपिकाने जिनयुई गोवर मात केली. तिने ११-६, १०-१२, ११-६, ११-४ अशा फरकाने शानदार विजय संपादन केला. सौरभने जॉर्डनच्या अहमद खलील अल्सराजचा पराभव केला.

बास्केटबॉल : भारत विजयी
भारतीय पुरुष बास्केटबॉल संघाने स्पर्धेत विजयाने सुरुवात केली. ब गटात झालेल्या लढतीत भारताने पॅलेस्टाइनला ८९-४९ ने मात दिली. पहिल्या हाफमध्ये भारताने २०-६ व दुसऱ्या हाफमध्ये ४०-२३ ने आघाडी घेतली. तिसऱ्या हाफमध्ये ६८-४१ गुणांसह आघाडी मजबूत केली होती.

व्हॉलीबॉल : भारताची आगेकूच
इंचियोन / आशियाई स्पर्धेत भारतीय व्हॉलीबॉल संघाने विजयी सुरुवात केली. क- गटात झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने हाँगकाँगवर ३-१ ने मात केली.पहिला सेट २३-२५ ने गमावल्यानंतर भारताने पुनरागमन करत सामना जिंकला.