मुंबई - भारतात प्रथमच स्क्वॅशच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जेएसडब्ल्यू चॅलेंजर सर्किटचे आयोजन ऑक्टोबर महिन्यात करण्यात आले असून या स्पर्धा मुंबई, जयपूर आणि चेन्नईमध्ये रंगणार आहेत. प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा भारतात होणार असल्याने स्क्वॅशमधील देशातील उभरत्या खेळाडूंना त्यामुळे आंतरराष्ट्रीय खेळाडूंना जवळून पाहण्याची तसेच स्थानिक खेळाडूंना अधिकाधिक गुण कमावण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे पीएसएचे आशिया प्रतिनिधी ऋत्विक भट्टाचार्य यांनी सांगितले.
पुरुष विजेत्यांना १० हजार अमेरिकन डॉलर आणि महिला गटातील विजेत्यांना ५ हजार अमेरिकन डॉलरच्या बक्षिसाने गौरवण्यात येणार आहे. देशात होणार्या या स्पर्धेने देशातील खेळाडूंसाठी खूप मोठी संधी उपलब्ध करून दिली असल्याचे भारताची प्रख्यात स्क्वॅशपटू दीपिका पल्लिकल हिने म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ गेममध्ये दीपिका आणि ज्योत्स्ना चिन्नप्पा यांनी भारताला दुहेरीचे विजेतेपद पटकावून दिले होते. मी सध्या आशियाई स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले असले तरी भारतात होणार्या या पहिल्या स्पर्धेत खेळण्यास मी खूपच उत्सुक असल्याचेही दीपिकाने म्हटले.
(फोटो : मुंबई येथे बुधवारी आयोजित एका कार्यक्रमात स्क्वॅशपटू दीपिका पल्लिकल आणि सौरव घोषल एकत्र आले तो क्षण. या वेळी इंडियन चॅलेंजर सर्किटची घोषणा करण्यात आली)