आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jwala Gutta ​lashes Out At Sports Ministry After Being Left Out Of Funding Scheme

ऑलिम्पिक पोडियम योजनेत सहभागी न केल्याबद्दल क्रीडा मंत्रालयावर "ज्वाला' भडकली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सतत वादविवादांमध्ये गुरफटलेली बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा आणि तिची दुहेरीतील साथीदार अश्विनी पोनप्पा हिला केंद्र शासनाच्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेत सहभागी न केल्याबद्दल ज्वालाने क्रीडा मंत्रालयाच्या कारभारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
या योजनेअंतर्गत २०१६ ऑलिम्पिकमध्ये संभावित पदकविजेते ठरू शकणाऱ्या खेळाडूंना निधी उपलब्ध करून देण्याचा हा प्रयास करण्यात आला आहे. ज्वालाने क्रीडा मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात या प्रकारामुळे मी अतिशय व्यथित झाले असल्याचे म्हटले आहे. मला नुकतेच समजले की त्या योजनेत माझा आणि अश्विनीचा सहभाग करून घेण्यात आलेला नाही. आधीच बॅडमिंटन संघटनेने आमचा आधार काढून घेतला असून आता क्रीडा मंत्रालयानेदेखील तोच कित्ता गिरवला आहे. ज्या खेळाडूंना पूर्वीपासूनच कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात मदत मिळत आहे, त्यांचाच विचार मंत्रालयानेदेखील केला असल्याचा आरोपदेखील ज्वालाने पत्राद्वारे केला आहे.

बॅडमिंटनला फायदा पण... : क्रीडा मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडिया इन्फ्रास्ट्रक्चरने ऑलिम्पिकमधील संभावित पदकविजेत्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. त्याअंतर्गत तीन वर्षे प्रत्येकी १० कोटींप्रमाणे एकूण ३० कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. त्याचा पहिला लाभ बॅडमिंटनला मिळणार असला, तरी त्याचा आम्हाला काहीच लाभ होणार नसल्याबाबतही ज्वालाने खेद व्यक्त केला आहे.
मेहनतीचे फळ हेच का ?

आम्ही दुहेरीत देशाचे नाव रोशन करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. अनेक प्रकारच्या विपरीत परिस्थितींतूनही पदके मिळवत देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकत ठेवले. मात्र, बॅडमिंटन संघटनेने आम्हाला सतत हतोत्साहित केले आणि आता सरकारदेखील तेच करत आहे. आमच्या मेहनतीचे आणि देशाचे नाव झळकवत ठेवण्याचे हेच फळ आहे का ? आम्ही काही बोललो तर आम्हाला चुकीचे ठरवले जाईल आणि बोललो नाही की अशाप्रकारे लाभापासून वंचित ठेवून अन्याय केला जाईल, असेही तिने नमूद केले आहे.