आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत के. श्रीकांतचे स्वप्न भंगले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलून- आठवडाभरात सलग दुसऱ्या किताबावर नाव कोरण्याचे युवा खेळाडू के. श्रीकांतचे स्वप्न शनिवारी भंगले. त्याला हाँगकाँग ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. यासह त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

चीन ओपनमध्ये ऑलिम्पिक चॅम्पियन लीन डॅनला हरवणाऱ्या श्रीकांतला उपांत्य लढतीत चेन लोंगने धूळ चारली. वर्ल्ड चॅम्पियन लोंगने २१-१७, १९-२१, २१-६ अशा फरकाने उपांत्य सामना जिंकला. यासह अव्वल मानांकित खेळाडूने पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली.

चीन ओपनचा चॅम्पियन श्रीकांत आणि वर्ल्ड चॅम्पियन चेन लोंग यांच्यात शर्थीची झुंज रंगली होती. दोन्ही तुल्यबळ खेळाडूंनी सरस खेळी करताना विजयासाठी प्रयत्न केले. पहिल्या गेममध्ये अपयशाला सामोरे जाणाऱ्या श्रीकांतने दुसऱ्या गेममध्ये बाजी मारली. यासह त्याने सामन्याला कलाटणी दिली. मात्र, त्याचा निर्णायक तिसऱ्या गेममध्ये फार काळ निभाव लागला नाही. सलग गुणांची कमाई करत चेन लोंगने सामना आपल्या नावे केला.

चेनचा श्रीकांतविरुद्ध दुसरा विजय
चेन लोंग आणि श्रीकांत हे दोघेही दुसऱ्यांदा समोरासमोर आले होते. यात चेन लोंगने आपला दबदबा कायम ठेवताना भारताच्या खेळाडूवर दुसऱ्यांदा मात केली. यापूर्वी २०१४ च्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत या दोन्ही खेळाडूंचा सामना रंगला होता. यात चेनने श्रीकांतला पराभूत केले होते.