आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्री कबड्डी स्पर्धा : बंगळुरूची पुण्यावर मात; अजय चमकला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीमुळे शनिवारी सलामीच्या दिवशी दबावाखाली खेळणार्‍या कबड्डी संघांनी रविवारी दुसर्‍या दिवशी मात्र मुक्तपणे खेळ केला. त्यामुळे बंगळुरू बुल्स आणि पुणेरी पलटण यांच्यातील रोमहर्षक लढत 40व्या मिनिटापर्यंत रंगली. बंगळुरू संघाने 40-37 अशी अवघ्या तीन गुणांनी ही लढत जिंकली. बंगळुरू संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला चढाईबहाद्दर अजय ठाकूर.
अजय ठाकूरच्या पल्लेदार चढायांमुळे पुणे पलटणची आघाडी प्रत्येक वेळी कमी कमी होत होती. मध्यंतरापूर्वी अजय ठाकूरने एकाच चढाईत चार खेळाडू टिपले आणि बंगळुरूने पिछाडी भरून काढत 21-23 अशी मजल मारली. मध्यंतरानंतरच्या 10 मिनिटांच्या खेळात बंगळुरू संघाचा कप्तान मनजित चिल्हर अनेक चुका करत असतानाही अजय ठाकूरने गुण घेण्याचा सपाटा कायम ठेवला. त्यामुळे 29-29 अशा बरोबरीत गाठल्यानंतर बंगळुरूने पुण्यावर 39-31 अशी निर्णायक आघाडी मिळवली. त्या वेळी सामन्यातील शेवटची चार मिनिटे शिल्लक होती.
दुसर्‍या सामन्यात यू मुंबाने कोलकाता संघाचा 36-25 असा पराभव केला. यू मुंबाने शनिवारी झालेल्या सलामीच्या सामन्यात जयपूरला हरवले होते.
अजयचे 15 गुण
पुणेरी पलटणने मग अखेरचे प्रयत्न म्हणून खोलवर चढाया केल्या व क्षेत्ररक्षणात पकडी केल्या. मात्र, सामना संपल्याची शिट्टी पंचांनी फुंकली त्या वेळी त्यांचे हे प्रयत्न 3 गुणांनी थिटे पडले. एकट्या अजय ठाकूरने चढाईत एकूण 15 गुण टिपले.

छायाचित्र - सुरवातीच्या सामन्याला चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती होती.