आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबड्डीलाही आता ‘मॅच फिक्सिंग’चा कलंक! महाराष्ट्राच्याच दोन खेळाडूंनी केले 'फिक्सिंग’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - क्रिकेटच्या ‘मॅच फिक्सिंग’चे किस्से आता सगळ्यांनाच ज्ञात असले तरी ज्या खेळाला महाराष्ट्राचा खेळ म्हणून गौरवले जाते, त्या कबड्डीलाही ‘मॅच फिक्सिंग’चा कलंक लागला आहे. विशेष म्हणजे हे ‘मॅच फिक्सिंग’ महाराष्ट्राच्याच दोन खेळाडूंनी केले असल्याचा आरोप महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकानेच केला असून त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य संघटनेच्या वतीने त्रिसदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आहे.
बिहारमध्ये गत महिन्यात राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा मोठ्या गाजावाजासह पार पडल्या. या स्पर्धेतील अंतिम सामना महाराष्ट्र विरुद्ध राजस्थान असा खेळला गेला. त्यात राजस्थानच्या संघाकडून महाराष्ट्राला धक्कादायकरीत्या अगदी निसटता पराभव स्वीकारावा लागला.
साखळीत दणदणीत विजय
हा पराभव धक्कादायक यासाठी होता की, त्याच राजस्थानच्या संघाला महाराष्ट्राने साखळी फेरीत 23 गुणांच्या फरकाने हरवून दणदणीत विजय मिळवला होता. ज्या संघाला इतक्या मोठ्या फरकाने हरवले त्याच संघाकडून महाराष्ट्र पराभूत होईल, असा विचारही कोणाच्या मनात आला नव्हता. महाराष्ट्राचा संघ अंतिम सामन्यात पराभूत झाल्याने कबड्डीतील जाणकारांना तसेच मैदानावर उपस्थित कबड्डी संंघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांना जबर धक्का बसला.
एक खेळाडू एकाच कोपर्‍यात 7 वेळा बाद
अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या एका आक्रमण करणार्‍या खेळाडूला राजस्थानच्या एकाच खेळाडूकडून एकाच कोपर्‍यात 7 वेळा बाद झाला. तसेच सामना संपण्यापूर्वीच्या अखेरच्या क्षणी सामना बरोबरीत होता. त्याच वेळी ज्या खेळाडूने एन्ट्री टाकू नये, असे सांगण्यात आले होते, त्यानेच एन्ट्री टाकून तो स्वत: सहज बाद झाल्याने महाराष्ट्राच्या हातून विजेतेपद निसटले.
संघ प्रशिक्षक बेंडगिरी यांनीच केली तक्रार
महाराष्ट्राच्या संघाचे प्रशिक्षक रमेश बेंडगिरी यांनीच या पराभवाबद्दल आणि त्यात दोन कबड्डीपटूंनी केलेल्या फिक्सिंगबद्दल थेट राज्य कबड्डी संघटनेकडेच तक्रार केली आहे. महाराष्ट्राच्या संघातील दोन खेळाडूंना भारताच्या संघात स्थान मिळवून देण्याची ‘ऑफर’ देण्यात आल्यामुळेच त्या दोघांनी अखेरच्या सामन्यात महाराष्ट्राच्या पराभवासाठीच ‘खेळ’ केल्याचा आरोप प्रशिक्षकांसह काही कार्यकारी सदस्यांनी केला आहे.
... तर संबंधित खेळाडूंवर कारवाई
महाराष्ट्राचा संघ ज्या संघाकडून आणि ज्या पद्धतीने हरला ते धक्कादायक होते. त्यातील काही खेळाडूंनी केलेला खेळ संशयास्पद असल्याबाबत प्रशिक्षक आणि कार्यकारी सदस्यांनी तक्रार केली आहे. त्याबाबत नुकत्याच झालेल्या राज्य संघटनेच्या बैठकीत चर्चा होऊन त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. अशी सामना फिक्सिंगची घटना झाल्याचे सिद्ध झाले तर ती महाराष्ट्राच्या दृष्टीने खरोखरच शरमेची बाब ठरेल. सिद्ध झाल्यास संबंधित खेळाडूंवर कठोर कारवाई करण्यात येईल.
दत्ता पाथ्रीकर, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना
अहवालासाठी समितीला एक महिन्याची मुदत
कबड्डीच्या त्या सामन्यातील गैरप्रकार आणि संबंधित आरोपांमधील सत्य शोधण्यासाठी राज्य संघटनेच्या बैठकीत सुनील जाधव, प्रकाश बोराडे आणि सपकाळे या तीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच समितीला सत्य शोधून त्याबाबतचा अहवाल सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.