आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबड्डी विश्वचषक स्पर्धा: भारतीय संघांची विजयी सलामी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होशियारपूर - मागच्या वर्षी विजेतेपदाला गवसणी घालणा-या भारतीय महिला आणि पुरुष कबड्डी संघाने चौथ्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. महिला गटात भारताने केनिया तर पुरुष गटात स्पेनला हरवत दुस-या फेरीत प्रवेश केला आहे.
स्पर्धेचा संभाव्य विजेता म्हणून बघितल्या जाणा-या भारतीय महिला संघासमोर पहिल्याच सामन्यात केनियाचे आव्हान होते. पहिल्यांदाच कबड्डी विश्वचषकात सहभागी झालेल्या अननुभवी केनियाच्या महिलांना या सामन्यात सुरुवातीपासूनच सूर गवसला नाही. भारतीय महिलांनी वर्चस्व गाजवत हा सामना 56-21 ने जिंकला. केनियाची टीम 10 अंकही बनवू शकेल की नाही अशी स्थिती होती, परंतु त्यांनी 21 गुणांपर्यंत मजल मारली.
भारतीय महिला संघाप्रमाणेच पुरुष संघानेही आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली. पुरुष गटात भारतासमोर स्पेनचे आव्हान होते. हा सामना रोमहर्षक होण्याची शक्यता होती मात्र, भारतीय खेळाडूंनी स्पेनला एकहाती मात दिली. भारताने हा सामना 55-27 अंकांनी जिंकला. या सामन्यात स्पेनने जिंकण्याचे जास्त प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही. बरेचदा प्रयत्न करूनही त्यांना भारताच्या तगड्या आव्हानासमोर तग धरता आली नाही. भारताने हा सामना आरामात जिंकत दुस-या फेरीचे तिकीट मिळवले आहे.