आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांगारूंना रिव्हर्स स्विंगचा धसका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारताचा दौरा ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या आपापल्या काळातील बलाढ्य संघांनाही खडतर वाटायचा. भारताच्या दौ-यावर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळणा-या विद्यमान ऑस्ट्रेलियन संघालाही नेमकी तीच गोष्ट सतावत आहे. भारताच्या संथ आणि फिरकीला साहाय्य करणा-या खेळपट्ट्यांवर वेगवान व मध्यमगती गोलंदाजी कशी करायची, याचा सध्या ते अभ्यास करत आहेत.
भारतातील मातीच्या खेळपट्ट्यांवर चेंडूची लकाकी लवकर जाते. चेंडू लवकरच खडबडीत पृष्ठभागाचा (रफ) होतो. त्यामुळे रिव्हर्स स्विंग लवकर होतो. भारतातील हवामान व खेळपट्ट्यांवर चेंडू कसा रिव्हर्स करायचा, याचा अभ्यास सध्या ऑस्ट्रेलियन गोलंदाज आणि त्यांचे प्रशिक्षक करत आहेत.

या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑस्ट्रेलियन संघ जगज्जेता असतानाही रिकी पाँटिंगच्या संघाला सापडले नव्हते. यापूर्वी भारताच्या दौ-या वर आलेला वेगवान डावखुरा गोलंदाज मिशेल जॉन्सन याने ‘रिव्हर्स स्विंग थिअरी’ समजून घेण्यासाठी अभिनव मार्ग स्वीकारला आहे. त्याने जहीर खानच्या भारतातील गोलंदाजीच्या ‘स्पेल’च्या कॅसेट्स आणून त्यांचे अवलोकन करण्यास सुरुवात केली आहे.

ऑस्ट्रेलियन संघ नेमक्या त्याच गोष्टीचा गंभीरपणे विचार करत आहे. मात्र ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक स्टीव्ह रिक्सन यांना, ऑस्ट्रेलियाची उच्च दर्जाची वेगवान गोलंदाजी खेळणे भारतीय फलंदाजांना भारतातील खेळपट्ट्यांवरही अवघड जाईल, असे वाटते. भारताच्या सीनियर खेळाडूंचे वाढते वय आणि संथ झालेल्या हालचाली, यामुळे ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांचा उत्साह वाढला आहे. त्याशिवाय उंचपु-या गोलंदाजांनी, 145 (ताशी किलोमीटर्स वेग) पेक्षा अधिक वेगात टाकलेला चेंडू खेळणे आशिया खंडातील कोणत्याही फलंदाजाला सहज शक्य होत नाही, असेही स्टीव्ह रिक्सन यांना वाटते. ऑस्ट्रेलियन फलंदाजांना जसे भारताच्या फिरकी गोलंदाजीचा सामना करताना अवघड होणार आहे, त्याप्रमाणे भारतीय फलंदाजांना ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजी खेळताना कठीण जाईल, असेही रिक्सन यांना वाटते. भले भारतातील हवामान व खेळपट्ट्या वेगळ्या असतील, परंतु वेगवान गोलंदाजी ही जर तुमची ताकद असेल तर त्या ताकदीचा तुम्हाला विसर पडता कामा नये, असेही ऑस्ट्रेलियन संघाच्या प्रशिक्षकांना वाटते. इंग्लंडने भारतात मिळवलेल्या यशाचा अभ्यासही कांगारूंनी केला आहे.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंची समस्या
ऑस्ट्रेलियाची समस्या रिव्हर्स स्विंग ही नसून भारतीय खेळपट्ट्यांवर मिळणारी कमी उसळी ही आहे. चेंडू कमरेच्या खालील उंचीपर्यंतच उसळल्यामुळे फलंदाजांना सतत वाकून खेळणे कठीण जाते.
इंग्लिश फलंदाजांना सतत वाकून खेळण्याची सवय तेथील संथ खेळपट्ट्यांमुळे आहे. त्यामुळे कुक आणि कंपनीतील काही खेळाडू मोठे डाव खेळू शकले. वेगवान खेळपट्ट्यांवर खेळायची सवय असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना भारताच्या संथ व कमी उसळी देणा-या खेळपट्ट्यांवर फलंदाजी करणे अवघड जाणार आहे.

मिशेल जॉन्सन म्हणतो...
जॉन्सन म्हणतो, ‘एसजी’ बॉलने गोलंदाजी करण्याचा अनुभव काही वेगळाच आहे. भारतात भारतीय गोलंदाज रिव्हर्स कसे करतात, याचे मला आश्चर्य वाटायचे. शिवणीवर चेंडू न टाकता तो सतत आडवा टाकून भारतीय गोलंदाजी करायचे. 10-12 षटके तसा चेंडू टाकल्यानंतर तो खडबडीत व्हायचा. खडबडीत पृष्ठभागावर घाम, थुंकी लावून तो विरुद्ध दिशेला स्विंग करण्यात भारतीय गोलंदाजांना यश यायचे.

जॉन्सन पुढे म्हणाला, ‘रिव्हर्स स्विंग खेळणे ही कोणत्याही फलंदाजासाठी अवघड गोष्ट आहे. भारताच्या दौ-यावर येताना आमच्या फलंदाजांनी म्हणूनच रिव्हर्स स्विंगवर एसजी बॉलने खेळण्याचा पर्थमध्ये अधिक सराव केला आहे. त्यामुळे सर्व जण चेन्नई येथील सराव सामन्यात आपण केलेला सराव कितपत उपयोगी पडत आहे ते पाहणार आहेत.’