आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kapil Dev Not Interested In Team Stratagy, Sachin Wrote In His Book

टीम रणनीतीत प्रशिक्षक कपिलची रुची नसे, पुस्तकात सचिनने केला खुलासा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ग्रेग चॅपेल यांच्यानंतर महान अष्टपैलू खेळाडू कपिलदेव यांच्याबाबत ‘प्लेइंग इट माय वे’ या आपल्या आत्मकथेत खुलासा केला आहे. सचिनच्या मते, कपिलदेवने प्रशिक्षक म्हणून आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडली नाही. संघाच्या बैठकीत आणि टीम रणनीतीमध्ये कपिलची रुची नसे, असेही सचिनने म्हटले.

सचिनने दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलिया दौ-यात तो कपिलमुळे खूप निराश झाला होता. कारण, कपिलच्या अनुभवाचा काहीच फायदा होत नव्हता. मी नेहमी म्हणत आलो की, कोचची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. संघाची रणनीती ठरवण्यात कोचची भूमिका महत्त्वपूर्ण असते. ऑस्ट्रेलिया दौ-यात आमची मदत करण्यासाठी कपिलपेक्षा उत्तम दुसरी कोणती व्यक्ती असेल? मात्र, दुर्दैवाने कपिलच्या सहभागाची पद्धत आणि त्याची विचार प्रक्रिया मर्यादित होती. यामुळे संपूर्ण जबाबदारी कर्णधारावर आली, असेही सचिनने म्हटले आहे. संघाच्या रणनीतीच्या बैठकीत कपिल उपस्थित नसल्यामुळे आम्हाला मैदानात मदत होत नसे, असा खुलासाही त्याने केला.

कप्तानपद अचानक काढून घेणे अशोभनीय : तेंडुलकर
कप्तानपदाची धुरा माझ्याकडून तडकाफडकी आणि कोणतीही सल्लामसलत न करता काढून घेण्याचा १९९७ चा प्रकार मला अत्यंत अशोभनीय आणि वेदनादायी वाटला होता, असे मत प्रख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने त्याच्या नुकत्याच प्रकाशित पुस्तकात व्यक्त केले आहे.

श्रीलंकेच्या दौ-यातील त्या वेदनादायी अनुभवाबाबत "प्लेइंग इट माय वे' पुस्तकात सचिनने त्याचे मत व्यक्त केले आहे. श्रीलंकेच्या त्या तीन सामन्यांच्या मालिकेनंतर सचिनचे कप्तानपद काढून घेण्यात आल्याचे त्याला निवासस्थानी असताना कळले. दौरा संपल्यानंतर बीसीसीआयच्या एकाही पदाधिका-याने मला काहीही न कळवता कप्तानपद काढून घेतले. माझे कप्तानपद काढून घेण्यात आल्याचे मला प्रसारमाध्यमांकडूनच समजले. अर्थात, त्या घटनेने मला मानसिकदृष्ट्या अधिक भक्कम केले. मला कप्तान म्हणून न विचारता काढले असले तरी निदान खेळाडू म्हणून माझ्याशी तसे कुणीही वागू शकणार नाही, असा खेळ कायम करत राहण्याचा मी मनाशी निर्धार केल्याचेही सचिनने म्हटले आहे.

स्किपर नावाने हाक
- कप्तानपदाच्या कारकीर्दीत मला सहकारी ‘स्किप’ म्हणून हाक मारू लागले होते. कप्तानपदावरून पायउतार झाल्यानंतरही जेव्हा ढाक्यातील एका सामन्यात एका सहका-याने मला स्किपर म्हणून हाक मारली त्या वेळी मी मैदानावरच संबंधित खेळाडूच्या जवळ जाऊन त्याला प्रत्युत्तर दिले.
- इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करून केवळ खेळावरच लक्ष केंद्रित करायचे आणि भारतीय संघाला सामने जिंकून द्यायचे, हा मी निश्चयच केल्याचे सचिनने नमूद केले.
- दौ-यातील एका महत्त्वाच्या सामन्यात माझ्यासमोरील साइट स्क्रीनवर काहीतरी हालचाल सुरूच होती. त्यामुळे माझे लक्ष विचलित होऊन माझी विकेट पडली. त्यानंतर पॅव्हेलियनकडे परतताना कुणीतरी माफी मागायला लागले. त्या वेळी मी त्यांच्याकडे रागाने पाहून असे प्रकार होणार असतील तर बांगलादेशमध्ये आंतरराष्ट्रीय सामनेच व्हायला नको, असे सांगितले.
- यादरम्यान काही वेळाने मला समजले की ते बांगलादेश क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष आणि सध्याचे आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष असलेले मोहंमद अश्रफुल हक आहेत. त्यानंतर क्रिकेट दौ-या दरम्यान आम्ही दोघे जेव्हाही भेटतो तेव्हा झाल्या प्रकाराबद्दल एकमेकांकडे दिलगिरी व्यक्त करतो, असेही या वेळी भारताच्या मास्टर ब्लास्टर सचिनने नमूद केले आहे.