आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंगळुरू- पाच वेळच्या विजेत्या कर्नाटकने रविवारी इराणी चषकात घरच्या मैदानावर शेष भारताविरुद्ध शानदार कामगिरी केली. कर्णधार विनयकुमार (6/47) आणि स्टुअर्ट बिन्नी (3/35) यांनी धारदार गोलंदाजी करताना पाहुण्या शेष भारताचा पहिल्या डावात 201 धावांत धुव्वा उडवला. प्रत्युत्तरात यजमान कर्नाटकने पहिल्या दिवसअखेर 1 बाद 35 धावा काढल्या. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा लोकेश राहुल (28) आणि गणेश सतीश (7) खेळत होते. रॉबिन उथप्पा भोपळाही न फोडता तंबूत परतला. शेष भारताकडून अशोक डिंडाने एक विकेट घेतली. औरंगाबादच्या अंकित बावणेला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही.
नाणेफेक जिंकून कर्नाटकचा कर्णधार विनयकुमारने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्याने पहिल्याच चेंडूवर सलामीवीर जीवनज्योतला बाद करून हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले. त्यानंतर त्याने बाबा अपराजित (2), केदार जाधव (2) या जोडीला तंबूत पाठवले. मोठ्या खेळीच्या प्रयत्नात असलेला गौतम गंभीर (22) पुन्हा अपयशी ठरला. त्याला बिन्नीने बाद केले. दिनेश कार्तिकने (91) संघाचा डाव सावरला. त्याने मिश्रासोबत (47) सहाव्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. त्यानंतर त्याने कर्णधार हरभजनसोबत (25) सातव्या गड्यासाठी 70 धावांची भागीदारी करून संघाला सन्मानजनक स्कोअर उभा करून दिला.
संक्षिप्त धावफलक
शेष भारत : पहिला डाव-201, कर्नाटक : पहिला डाव-1 बाद 35 धावा (राहुल नाबाद 28, 1/19 डिंडा)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.