आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केविन पीटरसनसंबंधीचा ई-मेल लीक ! ड्रेसिंग रूममध्ये येऊन युवा खेळाडूंना शिवीगाळ करायचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - माजी इंग्लिश क्रिकेटपटू केविन पीटरसनविरुद्धचा एक ई-मेल लीक झाला आहे. यात मागच्या अ‍ॅशेस मालिकेदरम्यान केविन पीटरसनच्या वाईट वर्तणुकीचा उल्लेख आहे. चौथ्या कसोटीत लवकर बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये येऊन केपीने युवा खेळाडूंना शिवीगाळही केली होती, अशी माहिती या ईमेलमध्ये आहे.

क्रिकइन्फोला मिळालेला हा मेल माजी कोच अँडी फ्लॉवर यांनी केलेला नसल्याचे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे. हा त्याच्या वकिलाने तयार केलेला मेल असून हा गोपनीय होता, असे ईसीबीने सांगितले.

अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर संघातील खेळाडूंनी केपीला त्याच्या १०० व्या कसोटीच्या आनंदात एक भेटवस्तू दिली होती. ड्रेसिंग रूममध्ये यापेक्षा उत्तम वातावरण मी कधीही पाहिले नाही, असे त्या वेळी केपीने म्हटल्याचे ईमेलमध्ये आहे.
दुसरीकडे केपीने हा मेल खोटा असल्याचे म्हटले आहे. जे काही घडत आहे ते अत्यंत लाजिरवाणे आहे. ज्याने कोणी मेल केला आहे त्याला कुकच्या नावाचे स्पेलिंगही नीट लिहिता आलेले नाही. याबाबत मी काहीच विचार करू शकत नाही. हा मेल एक विनोद आहे, असे केपीने म्हटले. विशेष म्हणजे पीटरसनने आपल्या आत्मकथेत ड्रेसिंग रूममध्ये काही खेळाडू दहशत पसरवत असल्याचा आरोप केला आहे.

पुनरागमनाचा मार्ग बंद : हुसेन
पीटरसनची आत्मकथा प्रसिद्ध झाल्यानंतर माजी कर्णधार नासेर हुसेनने त्यावर नाराजी व्यक्त करताना विरोधही दर्शवला. आता संघात केपीच्या पुनरागमनाचे मार्ग मला दिसत नाहीत. केपी आणि इतर खेळाडूंत आपसांत सन्मान राहिलेला नाही. यामुळे पुनरागमन शक्य दिसत नाही, असे हुसेनने नमूद केले.

पीटरसनला वॉनचा पाठिंबा
एकूणच प्रकरणात माजी कर्णधार मायकेल वॉनने केविन पीटरसनची पाठराखण केली आहे. केपीबाबत जे प्रकार चर्चेत येत आहे, ते दुर्देवी आहे. ड्रेसिंग रुममध्ये प्रकरण योग्यपणे हाताळता आले असते, असे वॉन म्हणाला.