नाशिक - महाराष्ट्र राज्य खो-खो संघटना आणि नाशिक जिल्हा खो-खो संघटनेच्या वतीने कुमार गटाच्या मुले आणि मुलींची ४२ वी राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे २५ ते २८ सप्टेंबरदरम्यान नाशकात आयोजन करण्यात आले आहे. विभागीय क्रीडा संकुलात होणा-या या स्पर्धेत राज्यातील २४ जिल्ह्यांचे मुला आणि मुलींचे एकूण ४८ संघ सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र खो - खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष मंदार देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे वेळापत्रक बदलून त्या ७ ऑक्टोबरपासून घेण्यात येणार असल्याने यंदा अचानकपणे या राज्यस्तरीय स्पर्धा २५ सप्टेंबरपासून घेण्यात येत असल्याचे देशमुख यांनी नमूद केले.
स्पर्धेसाठी विभागीय क्रीडा संकुलात ४ मैदाने सज्ज करण्यात आली. स्पर्धेचा शुभारंभ २५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी नाशिकसह नगर, औरंगाबाद, बीड, धुळे, जळगाव, हिंगोली, जालना , लातूर, मुंबई, उपनगर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, रायगड, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे, पुणे आणि पालघर या २४ जिल्ह्यांच्या संघ सहभागी होणार आहेत.
स्पर्धेचे होणार रेकॉर्डिंग
स्पर्धेत खेळणा-या संघांचे गुण प्रेक्षकांना दिसावेत यासाठी इलेक्ट्रॉनिक गुणफलकाचादेखील वापर करण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेचे सर्व रेकॉर्डिंगदेखील करून ठेवण्यात येणार असल्याने भविष्यात ते उपयुक्त ठरू शकणार आहे. स्पर्धेचे निकालदेखील राज्यसंघटनेच्या वेबसाइटवर टाकून सतत अपडेट ठेवले जाणार असल्याचेही मंदार देशमुख यांनी सांगितले.