आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kings Elevan Punjab Vs Royal Challengers Bengaluru

IPL: गिलख्रिस्‍टच्‍या धडाक्‍यात बंगळुरु भुईसपाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - प्लेअर ऑफ द मॅच 41 वर्षीय कर्णधार गिलख्रिस्टची (नाबाद 85) शानदार खेळी आणि त्याने अझहर मेहमूदसोबत (61) दुसर्‍या विकेटसाठी केलेल्या 118 धावांच्या भागीदारीच्या बळावर किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएल-6 मध्ये सहावा विजय मिळवला. किंग्जच्या खेळाडूंनी रॉयल चॅलेंर्जसला त्यांच्याच मैदानावर 7 विकेटने पराभूत केले. किंग्जने यापूर्वी मोहालीच्या सामन्यातही बंगळुरूला हरवले होते.

बंगळुरूने क्रिस गेल (77) आणि कर्णधार विराट कोहली (57) यांच्या साह्याने 5 बाद 174 धावांचा सन्मानजनक स्कोअर उभा केला. मात्र, किंग्ज पंजाबने 18.1 षटकांत तीन बाद 176 धावा काढून जबरदस्त विजय मिळवला. किंग्जकडून सलामीवीर अँडम गिलख्रिस्टने 54 चेंडूंत 10 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने विजयाचा पाया रचला.

पंजाबच्या आशा कमीच
पंजाबने 14 सामन्यांत सहावा विजय मिळवून आपली गुणसंख्या 12 इतकी केली. पंजाबने विजय मिळवला असला, तरीही प्लेऑफमध्ये पोहोचण्याची त्यांची आशा कमीच आहे. खूपच मोठा चमत्कार घडला तरच पंजाबची टीम प्लेऑफ खेळू शकते. पंजाबने आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकले तरीही प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता कमीच आहे. दुसरीकडे बंगळुरूचा 15 सामन्यांत सातवा पराभव झाला. या पराभवामुळे बंगळुरूचे गणित बिघडले आहे. आता प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी बंगळुरूला सनरायझर्स हैदराबादच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल.

शंभराव्या सामन्यात विजयी जल्लोष
कर्णधार गिलख्रिस्टने आपल्या 100 व्या टी-20 सामन्यात विजयी जल्लोष केला. स्पध्रेत सुरुवातीला पंजाबची टीम लयीत नव्हती. त्या वेळी सर्व काही संपल्यासारखे वाटत होते. मात्र, पंजाबने शानदार लय मिळवून स्पध्रेत पुनरागमन केले. पंजाबकडून सामन्यात आर. सतीशने (नाबाद 12) विजयी चौकार मारला.

अखेरच्या 10 षटकांत 122 धावा : बंगळुरूने सुरुवातीच्या दहा षटकांत 52 धावा काढल्या, मात्र गेल आणि कोहलीच्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर अखेरच्या 10 षटकांत 122 धावा निघाल्या.

गेल-कोहलीची 136 धावांची भागीदारी
तत्पूर्वी, किंग्ज इलेव्हनने टॉस जिंकून रॉयल चॅलेंर्जसला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. कॅरेबियन तुफान क्रिस गेल (77) आणि कर्णधार विराट कोहली (57) यांच्या अर्धशतकांच्या बळावर बंगळुरूने 5 बाद 174 धावा काढल्या. दोघांनी 14.2 षटकांत 136 धावांची भागीदारी केली. गेलने 53 चेंडूंत 77 धावांच्या खेळीत 6 षटकार आणि 4 चौकार मारले. कोहलीने 43 चेंडूंत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 57 धावा काढल्या. गेलने 40 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले.

गेलने ठोकले सलग तीन षटकार
कॅरेबियन स्टार आणि धोकादायक फलंदाज क्रिस गेलने 15 व्या षटकात गोनीच्या चेंडूवर सलग तीन षटकार मारले. पुढच्या षटकात कोहलीने परविंदर अवानाच्या गोलंदाजीवर षटकार आणि चौकार मारून धावगती वाढवली. गेलने 18 व्या षटकात संदीप शर्माला चौकार आणि षटकार मारला. याच षटकात कोहलीनेसुद्धा एक चौकार खेचला. अवानाने 39 धावांत 3 तर अझहर मेहमूदने 24 धावांत 2 गडी बाद केले.