आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोलकाता - आयपीएल-6 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने शुक्रवारी किंग्ज इलेव्हन पंजाबवर 6 गड्यांनी मात केली. मनविंदर बिस्लाने (51) नाबाद अर्धशतक ठोकून संघाला विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 6 बाद 149 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात 18.2 षटकांत यजमानांनी 4 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.
बिस्ला-मोर्गनची अर्धशतकी भागीदारी- गौतम गंभीर (8) व युसूफ (0) स्वस्तात बाद झाले. दोन बाद 10 अशी धावसंख्या असताना मनविंदर बिस्ला आणि जॅक कॅलिसने संघाची बाजू सावरली. या दोघांनी तिस-या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी करून संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला. दरम्यान, हरमितने कॅलिसला झेलबाद केले. त्याने 33 चेंडूंत सहा चौकार ठोकून 37 धावा काढल्या. त्यानंतर बिस्ला व मोर्गनने चौथ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी करून केकेआरचा विजय निश्चित केला. मोर्गनने 26 चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकार ठोकले, तर बिस्लाने 44 चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकार मारून नाबाद 51 धावा काढल्या.
तत्पूर्वी, पंजाबचा कर्णधार अॅडम गिलख्रिस्टने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. गिलख्रिस्ट व मनदीपने संघाला दमदार सुरुवात करून दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. दरम्यान, कॅलिसने या जोडीला रोखले. त्याने मनदीपला मोर्गनकरवी झेलबाद केले. मनदीपने 20 चेंडूंत पाच चौकारांसह 25 धावा काढल्या. त्यानंतर कर्णधार गिलख्रिस्टला मनन वोहराची साथ मिळाली. या दोघांनी दुस-या गड्यासाठी 22 धावांची भागीदारी करताना संघाच्या धावसंख्येला गती दिली. भाटियाने गिलख्रिस्टला (25) बाद केले.
वोहराची खेळी व्यर्थ- वोहराने संघाचा डाव सावरून हसीसोबत 29 धावांची भागीदारी केली. त्याने 21 चेंडूंत तीन चौकार व एका षटकारासह संघाकडून सर्वाधिक 31 धावा काढल्या. डेव्हिड मिलर (10), हसी (21) आणि गुरकिरत सिंगने (28*) संघाला सन्मानजनक धावसंख्या उभी करून दिली. केकेआरकडून कॅलिसने 14 धावा देत दोन विकेट घेतल्या. बालाजी, सरबजित लढ्ढा आणि रजत भाटियाने प्रत्येकी एक गडी बाद केला.
पराभवाची परतफेड- 16 एप्रिलला मोहालीत यजमान पंजाबने कोलकात्याला चार धावांनी पराभुत केले होते. केकेआरने घरच्या मैदानावर या पराभवाची परतफेड पंजाबला केली.
संक्षिप्त धावफलक - पंजाब- 6 बाद 149 धावा पराभूत वि. कोलकाता- 4 बाद 150
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.