आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिद्दीला सलाम: कर्ज काढून किशोरने शरीरसौष्‍ठव प्रकारात मिळवले सुवर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - घरच्या हलाखीच्या परिस्थितीत बँकेकडून कर्ज काढून जालन्याच्या पोलिस कॉन्स्टेबल किशोर डांगेने नॉर्थ बेलफास्ट (आयर्लंड) येथे झालेल्या जागतिक पोलिस अँड फायर स्पर्धेत शरीरसौष्ठव प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
स्पर्धेच्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती. मात्र, मित्रांनी केलेल्या मदतीच्या जोरावर त्याने स्पर्धेत सहभाग नोंदवून पहिल्यांदाच भारताला सुवर्णपदक जिंकून देत इतिहास रचला. त्याच्या मित्रांनी शहरात रॅली काढून त्याच्यासाठी आर्थिक मदत जमा केली.


किशोरने स्पर्धेत 95 किलो वजनी गटात ही कामगिरी साधली. स्पर्धेत एकूण 77 देशांच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. किशोर दररोज सकाळ-सायंकाळ 3-3 तास जिममध्ये मेहनत घेतो. त्याला प्रशिक्षक प्रशांत महाजन व जितेंद्र कदम यांचे मार्गदर्शन लाभत आहे. ‘माझे मुख्य लक्ष्य मि. ऑलिम्पिया बनण्याचे आहे. सध्या आगामी मि. युनिव्हर्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्यावर माझा फोकस राहील,’ असे किशोर म्हणाला.


या यशाबद्दल पोलिस अधीक्षक संजय मोहिते, आशियाई बॉडी बिल्डिंग फेडरेशनचे सरचिटणीस संजय मोरे यांनी त्याचे अभिनंदन केले.


खेळाबाबत शासन उदासीन
विविध खेळांच्या तुलनेत शासनाचे शरीरसौष्ठव या खेळाकडे दुर्लक्ष आहे. इतर खेळाडूंना पदके जिंकल्यानंतर शासनाने त्यांना कोटी रुपयांची बक्षिसे दिली. चांगल्या पदाच्या नोक-या दिल्या. मात्र, बक्षीस नाही तर शरीरसौष्ठवपटूंना त्यांनी केवळ आहाराचा खर्च तरी द्यायला हवा, अशी खंत किशोरने व्यक्त केली. प्रायोजक मिळाल्यास देशासाठी आणखी पदके पटकावू, असा मनोदय त्याने व्यक्त केला.


मि. युनिव्हर्ससाठी थेट प्रवेश
किशोरची स्पर्धेतील टायटल विजेत्या मलेशियाच्या शरीरसौष्ठवपटूशी या वेळी तुलना करण्यात आली होती. त्याने केलेली उत्कृष्ट कामगिरी पाहता किशोरला लंडनमध्ये 12 ऑक्टोबरदरम्यान होणा-या मि. युनिव्हर्स स्पर्धेसाठी थेट प्रवेश देण्यात आला आहे. या स्पर्धेत विजेतेपद पटकावण्याचा विश्वास त्याने व्यक्त केला.