आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL : जडेजाच्या अष्टपैलू खेळीने चेन्नईची कोलकातावर मात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - ऑफस्पिनर युसूफ पठाणच्या चेंडूला डीप मिडविकेटवर षटकार खेचून रवींद्र जडेजाने चेन्नई सुपरकिंग्जला गतविजेता कोलकाता नाइट रायडर्सवर (केकेआर) शानदार विजय मिळवून दिला. ‘प्लेअर ऑफ द मॅच’ जडेजाने 14 चेंडूंत नाबाद 36 धावा (3 षटकार, 3 चौकार) ठोकल्या आणि 3 विकेटही घेतल्या. कोलकात्याच्या 9 बाद 119 धावांच्या मोबदल्यात चेन्नईने 6 बाद 124 धावा काढल्या. चेन्नईचा हा सहा सामन्यांत चौथा विजय तर कोलकात्याचा सहा सामन्यांत चौथा पराभव ठरला.

ईडन गार्डनवर धोनी ब्रिगेडने कमाल कामगिरी केली. सुरुवातीला त्यांनी बिनबाद 46 अशी शानदार सुरुवात करणा-या टीमला 119 धावांवर रोखले. यानंतर 4 बाद 54 अशा संकटमय स्थितीतून विजय मिळवला. चेन्नईकडून जडेजाशिवाय माइक हसीने 40 धावा काढल्या. चेन्नईचे माइक हसी (40), मुरली विजय (2), सुरेश रैना (7), महेंद्रसिंग धोनी (9) आणि एस. बद्रीनाथ (6) बाद झाल्यानंतर जडेजाने डेवेन ब्राव्होसोबत सातव्या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी करून विजय मिळवून दिला. चेन्नईकडून आश्चर्यकारकरीत्या आर. अश्विन (11 धावा) सलामीला आला.

गंभीर-युसूफ सलामीला
कोलकात्याकडून गौतम गंभीर अणि सलामीला आलेल्या युसूफ पठाणने प्रत्येकी 25 धावा काढल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 5.5 षटकांत 46 धावा जोडल्या. मात्र, यानंतर 9 धावांच्या अंतरात त्यांनी 4 विकेट गमावल्या. अचानक केकेआरची टीम 4 बाद 55 अशी संकटात सापडली. गौतम गंभीरने 19 चेंडूंत आपल्या डावात 5 चौकार आणि युसूफने 22 चेंडूंत 4 चौकार मारले. जॅक कॅलिसला तर भोपळासुद्धा फोडता आला नाही. मनोज तिवारीने 13 आणि देवब्रत दासने 19 धावा काढल्या.

जडेजाची शानदार गोलंदाजी
तत्पूर्वी, कोलकाता नाइट रायडर्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या (20 धावांत 3 विकेट) शानदार गोलंदाजीच्या बळावर चेन्नईने केकेआरला 9 बाद 119 धावांच्या सामान्य स्कोअरवर रोखले. जडेजाने आपल्या टीमकडून पुन्हा एकदा शानदार प्रदर्शन करताना 20 धावांत केकेआरचे महत्त्वाचे फलंदाज रजत भाटिया (1), लक्ष्मीरतन शुक्ला (1) आणि सुनील नारायण (13) यांना बाद केले.