आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kohli Brigad Give Tough Answer, First Round India Made 369 Runs On 5 Wicket

कोहली ब्रिगेडचे दमदार प्रत्युत्तर ! पहिल्या डावात भारताच्या ५ बाद ३६९ धावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अ‍ॅडिलेड - ऑस्ट्रेलियाच्या वेगवान तोफखान्याला जोरदार प्रत्युत्तर देताना विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली युवा ब्रिगेडने तडफदार कामगिरी केली. भारताने पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात तिस-या दिवशी ५ बाद ३५९ धावा काढल्या. प्रभारी कर्णधार विराट कोहलीने कसोटी कारकीर्दीतील सातवे शतक (११५) ठोकले. भारताकडून सलामीवीर मुरली विजय, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतकी खेळी केली. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील धावसंख्येपासून अद्याप १४८ धावांनी मागे आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी रोहित शर्मा ३३ आणि वृद्धिमान साहा एका धावेवर खेळत होते.

ऑस्ट्रेलियाने तिस-या दिवशी सकाळी आपला पहिला डाव १२० षटकांत ७ बाद ५१७ धावांवर घोषित केला. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने जबरदस्त प्रदर्शन करताना ११५ धावांची खेळी केली. विराटने १८४ चेंडूंचा सामना करताना १२ चौकार मारले. विराटने मधल्या फळीत अजिंक्य रहाणेसोबत चौथ्या विकेटसाठी १०१ धावांची शतकी भागीदारी केली. याशिवाय भारताकडून सलामीवर मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांनी दुस-या विकेटसाठी ८१ धावांची मजबूत भागीदारी केली होती. नंतर पुजाराने विराट कोहलीसोबत तिस-या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. भारतीय खेळाडूंनी उपयुक्त भागीदा-याकडून संघाचा स्कोअर तीनशेच्या पुढे पोहोचवला.

भारतीयांची सावध सुरुवात
सामन्याच्या तिस-या दिवशी भारतीय फलंदाजांनी सांभाळून खेळ केला. सलामीवीर मुरली विजयने चांगली सुरुवात केली. त्याने ८८ चेंडूंचा सामना करताना ३ चौकार आणि २ षटकार ठोकले. भारतीय सलामीवीर मुरली विजय आणि शिखर धवन यांनी ३० धावांची सलामी दिली. यात शिखर धवनच्या धावांचे योगदान २५ इतके होते. शिखर धवनने २४ चेंडूंचा सामना करताना ५ चौकारांच्या मदतीने या धावा काढल्या. शिखर बाद झाल्यानंतर भरवशाचा खेळाडू पुजाराने विजयच्या साथीने डाव सावरला. रेयान हॅरिसने त्याला ित्रफळाचीत केले. पुजाराने १३५ चेंडूंचा सामना करताना ७३ धावा काढल्या. या खेळीत त्याने ९ चौकार मारले. पुजाराने विजयसोबत उपयुक्त भागीदारी केली. जॉन्सनने ऑस्ट्रेलियाला दुसरे यश िमळवून दिले. जॉन्सनने हॅडिनकरवी मुरली विजयला ३०.१ षटकांत बाद केले.

दिग्गजांच्या पंक्तीत विराट कोहली...
कसोटीत विराट कोहलीने कर्णधार म्हणून खेळताना पहिल्याच सामन्यात शतक ठोकण्याचा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय कर्णधार ठरला आहे. कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात शतक ठोकण्याची कामगिरी यापूर्वी भारताकडून सुनील गावसकर (११६,वि. न्यूझीलंड १९७५-७६), विजय हजारे (१६४ वि. इंग्लंड, १९५१-५२) आणि दिलीप वेंगसरकर (१०२ वि. वेस्ट इंडीज, १९८७-८८) यांनी केली आहे. या दिग्गजांच्या पंक्तीत विराट पोहोचला आहे.

रहाणेने किल्ला लढवला
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लॉयनने पुजाराला ित्रफळाचीत केले. मात्र, प्रभारी कर्णधार विराट आणि रहाणे खेळपट्टीवर टिकून होते. चहापानाच्या ब्रेकपर्यंत दोघांनी भारताचा स्कोअर ३ बाद २२३ धावापंर्यंत पोहोचवला. दोघांनी दिवसातील सर्वात मोठी १०१ धावांची शतकी भागीदारी केली. लॉयनने रहाणेला वॉटसनकरवी झेलबाद करून भारतीयांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. रहाणे चौथ्या विकेटच्या रूपाने २९३ च्या स्कोअरवर बाद झाला. पाचव्या क्रमांकावर आलेल्या रहाणेने ७६ चेंडूंचा सामना करताना १० चौकारांच्या साहाय्याने ६२ धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली.

जॉन्सनने अडथळा दूर केला
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जॉन्सनने विराट कोहलीला हॅरिसकरवी झेलबाद केले. भारताचा खेळ संपण्यापूर्वी जॉन्सनने मोठा धक्का दिला. कोहलीने १८४ चेंडूंचा सामना करताना १२ चौकारांच्या मदतीने ही खेळी साकारली. दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी रोहित शर्माने ६१ चेंडूंचा सामना करताना ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ३३ धावा काढल्या होत्या. त्याच्यासोबत वृद्धिमान साहा १६ चेंडूंत १ धाव काढून खेळत होता. तत्पूर्वी, विराटने रोहित शर्मासोबत पाचव्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. विराटने अत्यंत शैलीदार फलंदाजी करताना दुबळ्या चेंडूंना सीमारेषेबाहेर पोहोचवले.

आम्ही स्वत:ला सिद्ध केले
ओव्हरऑल बघितले तर आमच्याकडे खूप चांगली फलंदाजाची फळी आहे. आमचा संघ युवांचा आहे. आम्हाला स्वत:ला सिद्ध करायचे होते. आम्ही आता स्वत:ला सिद्ध केले आहे. आम्ही स्कोअर गाठण्याच्या स्थितीत आहोत. - चेतेश्वर पुजारा.

बाउन्सरचा परिणाम नाही
विराटला बाउन्सर टाकल्यानंतर जॉन्सनवर काहीच परिणाम झाला नाही. तो यापुढे आणखी आक्रमक होईल. या बाउन्सरमुळे आम्हाला फिल ह्यूजच्या घटनेतील धक्क्यातून बाहेर येण्यास मदत झाली.

नॅथन लॉयन
हेही आहे महत्त्वाचे
- मुरली विजयने (५३) कसोटी कारकीर्दीतील सातवे अर्धशतक ठोकले. त्याचे हे ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरे अर्धशतक होते.
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुरली विजयने आतापर्यंत ७ कसोटींत ६१.०८ च्या सरासरीने ३ शतके, २ अर्धशतकांसह तब्बल ७३३ धावा काढल्या आहेत.
-चेतेश्वर पुजाराने (७३) कारकीर्दीतील सहावे कसोटी अर्धशतक, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथे अर्धशतक साजरे केले.
-भारताबाहेर पुजाराची आतापर्यंतची दुस-या क्रमांकाची सर्वोत्तम खेळी ठरली आहे. भारताबाहेर त्याची सर्वोत्तम कामगिरी द. आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग येथे १५३ धावा अशी आहे.
-ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तीन डावांत अर्धशतके ठोकण्याचा पराक्रम पुजाराने केला. या अर्धशतकापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्ली कसोटीत ५२ आणि नाबाद ८२ धावा काढल्या होत्या.
-ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुजाराने आतापर्यंत १० डावांत ७१.०० च्या सरासरीने ५६८ धावा काढल्या आहेत.
-ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७ कसोटींत कोहलीने तिसरे शतक ठोकले आहे.
-ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर मागच्या १२ डावांत वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय सलामीवीरांना अर्धशतकी सलामीसुद्धा देता आलेली नाही.
-अ‍ॅडिलेड येथे तीन डावांत कोहलीने ८४.३३ च्या सरासरीने दोन शतके ठोकली आहेत. येथे त्याने एकूण २५३ धावा काढल्या आहेत. मागच्या ऑस्ट्रेलिया दौ-यात त्याने येथेच शतक ठोकले होते.