आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रांसाठी 5 कोटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- जिल्हा पातळीवर खेळाडूंना नियमित प्रशिक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने जिल्हय़ाच्या ठिकाणी जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यभरासाठी 5 कोटी 6 लाख 97 हजार 500 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत अध्यादेश नुकताच शासनाने पारित केला आहे.

स्वतंत्र क्रीडाविषयक धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिलेच राज्य असून याअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्हा पातळीवर असे केंद्र स्थापन करण्याचा निर्णय याआधीच 14 जून 2012 रोजी शासनाने घेतला होता. असे केंद्र स्थापन केल्यामुळे खेळाडूंना नियमित प्रशिक्षण देणे सोयीचे ठरणार आहे. त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्याची गरज होती. त्यामुळेच केवळ आखणी न करता आता हा निधीही मंजूर करण्यात आल्याने 35 जिल्हय़ांत ही प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रत्येक जिल्हय़ासाठी 14 लाख 48 हजार 500 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून राज्यासाठीची ही रक्कम 5 कोटी 6 लाख 97 हजार 500 इतकी होते.

यावर करायचा आहे खर्च
क्रीडा साहित्य खरेदी, मैदान सेवकाचे मानधन, क्रीडाविषयक पुस्तके, नियतकालिके, सीडी, कार्यालयीन खर्च, अशासकीय प्रशिक्षक मानधन भत्ता, क्रीडा प्रशिक्षकांसाठी गणवेश, प्रवास खर्च यासाठी वरील निधी खर्च करावयाचा आहे.

प्रशिक्षण केंद्रे सक्षम होण्यास मदत
या योजनेमुळे राज्यातील सर्वच जिल्हास्तरीय प्रशिक्षण केंद्रे सक्षम होणार आहेत. कारण याआधी वर्षाकाठी प्रशिक्षण शिबिरासाठी 1 लाख 4 हजार रुपयांचा निधी येत असे. त्यामुळे प्रशिक्षण राबवण्यासाठीही र्मयादा येत होत्या. जिल्हय़ाला या योजनेतून पुरेसा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे ग्रामीण खेळाडूंना आणखी संधी उपलब्ध करून देता येणे शक्य होणार आहे.
-नवनाथ फरताडे, जिल्हा क्रीडा अधिकारी