आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातशे धावांचा टप्पा ओलांडणारा गेल पहिला खेळाडू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- वेस्ट इंडीजचा तुफानी फलंदाज क्रिस गेलने शुक्रवारी आपल्या खेळीदरम्यान आणखी एक विक्रम स्वत:च्या नावे केला. चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध 39 धावांच्या खेळीत गेलने स्पर्धेच्या इतिहासात 700 धावांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ब गटात वेस्ट इंडीजने पाकिस्तानला 2 विकेटने पराभूत करून विजयी सलामी दिली. या सामन्यात ‘रनमशीन’ गेलने संघाकडून सर्वाधिक 39 धावांची खेळी केली. या खेळीसह चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात त्याच्या नावे 734 धावा झाल्या. या स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणारा तो फलंदाज ठरला.

विक्रम मोडणे कठीण
ही शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. अशा परिस्थितीत गेलचा हा विक्रम दुसरा फलंदाज मोडण्याची शक्यता फारच कमी आहे. अनेक फलंदाजांना अद्याप या स्पर्धेत दोनशे धावांचा टप्पासुद्धा ओलांडता आलेला नाही. यामुळे गेलच्या जवळपाससुद्धा एखादा फलंदाज पोहोचण्याची शक्यता नाही.

तीन शतके गेलच्या नावे
गेलने 2002 ते 2013 दरम्यान स्पर्धेतील 15 सामन्यांत 56.46 च्या सरासरीने या धावा काढल्या आहेत. यात 133 धावांची खेळी सर्वोच्च ठरली आहे. गेलने चॅम्पियन्स ट्रॉफीत आतापर्यंत 3 शतके आणि एक अर्धशतक झळकावले. स्पर्धेत सर्वाधिक 92 चौकार आणि 14 षटकार मारले आहेत.

सौरव गांगुली दुसर्‍या स्थानी
चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक धावा काढण्याच्या यादीत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली 665 धावांसह दुसर्‍या, तर द. आफ्रिकेचा जॅक कॅलिस 653 धावांसह तिसर्‍या स्थानी आहेत.