आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाच्या मुख्य कोचसाठी मुलाखती, कुंबळेची मॅरेथॉन मुलाखत, शास्त्रीदेखील चर्चेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे, माजी खेळाडू प्रवीण अामरे, लालचंद राजपूत यांनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आपापले प्रेझेंटेशन सादर केले आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) तीनसदस्यीय समितीसमोर मुलाखतदेखील दिली. समितीने एकूण दहा जणांचे प्रेझेंटेशन पाहिले. समिती बुधवारी आपला अहवाल बीसीसीआयला सादर करणार आहे. बीसीसीआय २४ जून रोजी मुख्य प्रशिक्षकाचे नाव जाहीर करेल. रवी शास्त्री आणि अनिल कुंबळे या दोघांपैकी एक भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

तीनसदस्यीय समितीमध्ये माजी कर्णधार सौरव गांगुली, माजी खेळाडू व्ही.व्ही.एस. लक्ष्मणसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा समावेश आहे. सचिन लंडन येथून व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे मुलाखतीसाठी उपलब्ध होता. ४५ वर्षीय कुंबळे, ४७ वर्षीय आमरे आणि ५४ वर्षीय राजपूत यांनी समितीसमोर मुलाखत दिली. बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सूत्रांनुसार भारतीय संघाचे माजी संचालक रवी शास्त्री सध्या थायलंडमध्ये असून ते स्काइपद्वारे मुलाखतीत सहभागी झाले. समितीचे सदस्य सौरव गांगुलीने म्हटले की, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू स्टुअर्ट लाॅ आणि टॉम मूडीसह इंग्लंडचे अॅडी मोल्स यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे मुलाखत दिली.

मला मुलाखतीचे निमंत्रण नाही : मला मुख्य प्रशिक्षकपदाच्या मुलाखतीसाठी निमंत्रण मिळाले नाही. प्रशिक्षक कोणीही झाले तरी त्यांना माझा पूर्ण पाठिंबा असणार आहे, असे राष्ट्रीय निवड समितीचे प्रमुख संदीप पाटील यांनी म्हटले.

यंदा चॅपलसारखी चूक नाही
मुख्य प्रशिक्षक नियुक्त करताना यंदा ग्रेग चॅपलसारखी चूक केली जाणार नसल्याचे मुलाखतीपूर्वी सौरव गांगुलीने म्हटले. कोलकाता येथे एका पुस्तकाच्या प्रकाशनावेळी गांगुली म्हणाला की, मला एकदा प्रशिक्षक निवडीची संधी मिळाली होती. मात्र २००५ मध्ये सर्व गडबड झाली. यंदा असे होणार नाही. 'ए सेंच्युरी इज नॉट इनफ ' या माझ्या पुस्तकात चॅपल प्रकरणाची सविस्तर माहिती राहील.
बातम्या आणखी आहेत...