आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राच्या महिला उपविजेत्या, वरिष्ठ महिला वनडे क्रिकेट स्पर्धा: श्वेता मानेचे 4 बळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बीसीसीआयतर्फे आयोजित वरिष्ठ महिला वनडे क्रिकेट स्पर्धेत सुपर लीगमध्ये महाराष्ट्राने उत्तर प्रदेशवर 6 गडी राखून मात करत उपविजेतेपद पटकावले. महाराष्ट्राच्या अनुजा पाटीलने (नाबाद 57) अर्धशतक आणि श्वेता मानेने 4 बळी घेतले. लीगचे विजेतेपद रेल्वेने मिळवले. उत्तर प्रदेशचा संघ तिसर्‍या आणि मुंबई संघ चौथ्या स्थानावर राहिला.
प्रथम फलंदाजी करताना यूपीने 48.2 षटकांत सर्वबाद 119 धावा काढल्या. प्रत्युत्तरात महाराष्ट्राने 38 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. संघाची सुरुवात खराब झाली. मानसी पटवर्धन 1, स्मृती मानधना 25 आणि मुक्ता मगरे 4 धावा काढून बाद झाल्या. स्नेहल जाधव भोपळाही फोडू शकली नाही. त्यानंतर आलेल्या अनुजा पाटीलने नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. तिने 67 चेंडंत 11 चौकारांच्या मदतीने नाबाद 57 धावा काढल्या. देविका वैद्यने नाबाद 20 धावांचे योगदान दिले. यूपीच्या एम. व्ही. सिंगने 2 गडी टिपले. तत्पूर्वी यूपीतर्फे एन. एस. चौधरीने सर्वाधिक 32 धावा केल्या. इतर फलंदाजांनी निराशा केली. औरंगाबादचे प्रतिनिधित्व करणार्‍या श्वेता मानेने 10 षटकांत 20 धावा देत 4 बळी घेतले. तिने 2 षटके निर्धाव टाकली. अनुजा पाटील व प्रियंका गारखेडेने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.