आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचेन्नई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी झालेल्या आपल्या विशेष सर्वसाधारण बैठकीत आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारामुळे आजीवन बंदी घातली. बीसीसीआयने बुधवारी येथे बैठकीत शिस्तपालन समितीच्या अहवालावर चर्चा केली. त्यानंतर बंदीचा निर्णय घेण्यात आला.
तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला या विशेष बैठकीसाठी परवानगी दिली होती. त्यानंतर मंडळाने हा निर्णय घेतला. या बंदीनंतर मोदी आता भविष्यात मंडळाचे कोणतेही पद धारण करू शकणार नाही.
आठ प्रकरणांत दोषी
बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने मोदीला आठ विविध प्रकरणांत दोषी ठरवले. यात आर्थिक गैरव्यवहार, प्रशासकीय प्रकरणांत अनिश्चितता तसेच फ्रँचायझी व मीडिया अधिकारांची विक्री करताना गैरव्यवहार करण्याचा आरोप सामील आहे. मोदींना बाहेर काढण्यासाठी बीसीसीआयला दोनतृतीयांश मतांची गरज होती. मंडळात याला कसलीच अडचण आली नाही. हरियाणा क्रिकेट संघटनेचे
सचिव अनिरुद्ध चौधरी यांनी मोदींवर बंदीचा प्रस्ताव ठेवला. याला ओडिशा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रंजित बिस्वाल यांनी अनुमोदन दिले.
‘आम्ही विशेष बैठकीत शिस्तपालन समितीच्या अहवालातील सर्व प्रमुख पैलूंवर चर्चा केली. याशिवाय आम्ही मोदींनी मंडळाच्या सचिवांना मंगळवारी पाठवलेल्या पत्रावर विचारही केला. त्या पत्रात बैठक टाळण्याची विनंती करण्यात आली होती,’ असे बीसीसीआयने स्पष्ट केले. आयपीएलमध्ये पुणे आणि कोच्ची या दोन नव्या आयपीएल संघांचा समावेश झाल्यानंतर मोदीच्या अडचणी सुरु झाल्या. फ्रँचायझीच्या हक्काबाबत त्यांनी बरीच माहिती ट्विटरवर उघड केल्याने गोधंळ उडाला. मोदी प्रकरणामुळेच केंद्रीय मंत्री शशी थरूर यांना राजीनामा द्यावा लागला होता.
नियम 32 नुसार झाली कारवाई
मोदींवर अनेक प्रकरणांत गैरव्यवहार व अनियमितता ठेवण्यासारखे गंभीर आरोप असल्याचे तथ्य मंडळाच्या बैठकीत समोर आले. अशात मंडळाच्या घटनेतील नियम 32 नुसार मोदींच्या बरखास्तीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. प्रशासक म्हणून त्यांच्या सर्व अधिकारांना समाप्त करण्यात आले आहे. आता मोदी भविष्यात मंडळाच्या कोणत्याही पदावर येऊ शकणार नाहीत, असेही बोर्डाने स्पष्ट केले.
हेही आहे महत्त्वाचे !
* बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीमध्ये अरुण जेटली आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचा समावेश होता. त्यांनी जुलैमध्ये 134 पानी अहवाल सादर केला होता.
* आयपीएलला भारताची सर्वाधिक यशस्वी लीग करण्याचे मोदी यांचे स्वप्न होते. त्यांनी बीसीसीआयसोबत मिळून ही योजना आखली त्याला जिवंत रूप दिले. 2010 च्या आयपीएल फायनलनंतर लगेचच मोदी यांना अध्यक्षपदावरून बरखास्त करण्यात आले होते.
लढा सुरू राहीन
मी गेली तीन वर्षे असाही बीसीसीआयपासून दूरच होतो. मला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर माझा लढा सुरू होता आणि यापुढेही मी लढत राहीन. आज बीसीसीआयचा दिवस होता. या प्रकरणाचा शेवट माझ्या बाजूनेच होईल, याचा विश्वास आहे. - ललित मोदी.
मोदींमुळेच ‘मल्टी मिलियन डॉलर बेबी’ अर्थात आयपीएलचा जन्म
* आपल्या शानदार कल्पनेच्या बळावर क्रिकेटचे विश्व बदलण्याचे प्रयत्न करणारे ललित मोदी स्वत:च अनेक वादात अडकले. बीसीसीआयच्या या कडक निर्णयानंतर 49 वर्षीय मोदी आता क्रिकेटच्या दुनियेत प्रशासक म्हणून कधीच येऊ शकणार नाहीत.
* क्रिकेटच्या दुनियेत ललित मोदी यांचा उदय आश्वासक, चमकदार होता. क्रिकेट वर्तुळातून त्यांची ‘एक्झिट’ तितकीच नाट्यमय ठरली.
* मोदीच्या कल्पनेमुळेच ‘मल्टी मिलियन डॉलर बेबी’ म्हणून आयपीएलचा जन्म होऊ शकला. आयपीएलमुळे अनेक सामान्य खेळाडूंना लाखो रुपये मिळू शकले. इतकेच नव्हे तर जागतिक क्रिकेट वर्तुळात फुटबॉल आणि टेनिसच्या स्पर्धेत आयपीएलमुळे क्रिकेटचे वजन वाढले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.