आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लान्स आर्मस्ट्राँगला डोपिंग केल्याचा गुन्हा मान्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्टिन- सात वेळा टूर डी फ्रान्सचा विजेता राहिलेला प्रसिद्ध सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँगने अमेरिकेच्या वृत्तवाहिनीवरील ओप्रा विन्फ्रे शोमध्ये डोपिंगचा गुन्हा मान्य केला आहे. यूएस टुडेने यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. मात्र, विन्फ्रे व आर्मस्ट्राँगने अद्याप याबाबत कोणताही खुलासा केला नाही.

आपले टूर डी फ्रान्सचे जेतेपद व अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर मिळालेली प्रतिष्ठा गमावणा-या आर्मस्ट्राँगने नेहमी आपल्यावरील आरोप फेटाळले. गतवर्षी अमेरिकेच्या डोपिंग संस्थेने त्याच्यावर बंदी घातलेली औषधी घेतल्याचा आरोप लावला होता. त्यानंतर त्याच्यावर आजीवन बंदीदेखील घालण्यात आली होती.
अमेरिकी मीडिया गुरुवारी प्रक्षेपित होणा-या या मुलाखतीबाबत अनेक तर्कवितर्क काढत आहे. मात्र प्रसिद्ध झालेल्या वृत्तामध्ये आर्मस्ट्राँगने कोणते औषध घेतले, याचा खुलासा केलेला नाही.

यादरम्यान ‘मी आर्मस्ट्राँगसोबतची मुलाखत पूर्ण केली आहे. तब्बल अडीच तास ही मुलाखत सुरू होती. यासाठी आर्मस्ट्राँग पूर्ण तयारीनिशी आला होता,’ असे विन्फ्रेने ट्विट केले. विन्फ्रेच्या सीबीबी वृत्तवाहिनीवरदेखील या मुलाखतीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आर्मस्ट्राँग पुन्हा एकदा टेस्ट करण्यासाठी तयार आहे. तसेच करिअरमध्ये कमावलेली सर्व संपत्तीदेखील परत करण्याची तयारी त्याने दाखवली आहे, अशी माहिती सीबीसी वाहिनीने दिली. पूर्वी टेक्सास येथील घरात आर्मस्ट्राँगच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ही मुलाखत ऑ स्टिन येथील एका हॉटेलात घेण्यात आली.
2011 मध्ये निवृत्ती
टेक्सासच्या प्लानो येथे प्रसिद्ध सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँगचा जन्म 18 सप्टेंबर 1971 रोजी झाला. वयाच्या 12 व्या वर्षी त्याने पहिली राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेत त्याने 1500 मीटर फ्रीस्टाइल सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर तो सायकलिंगकडे वळला. सात वेळा टूर डी फ्रान्स जिंकून त्याने विक्रम केला. त्यानंतर त्याने 16 फेब्रुवारी 2011 रोजी निवृत्ती जाहीर केली.