आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओंकारच्या यशाला कांस्यची झळाळी !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लहानपणीच आई-वडिलांच्या वात्सल्यछत्रास पोरक्या झालेल्या ओंकार ओतारीने स्कॉटलंडमधील राष्ट्रकुल स्पर्धेत ‘कांस्य’नाद केला. मेहनत आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर त्याने वेटलिफ्टिंग प्रकारात भारतीय संघाच्या पदकाचा भार वाहिला. कुरुंदवाडच्या (जि. कोल्हापूर) या युवा खेळाडूने पुरुषांच्या 69 किलो वजन गटात ही चमकदार कामगिरी केली. यासह त्याने आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये एका पदकाची नोंद केली. त्याच्या रूपाने भारतीय
संघाला वेटलिफ्टिंगमध्ये दुसरे कांस्यपदक मिळाले.

काळाने हिरावले छत्र
इयत्ता दहावीत शिकत असतानाच ओंकारचे पितृछत्र हरवले. त्याच्या वडिलांचे निधन झाले. यातून सावरलेल्या ओंकारवर पुन्हा दुर्दैवाने दु:खाचा डोंगर कोसळला. काळाने त्याचे मातृछत्रही हिरावून घेतले. आजाराने ग्रस्त असलेल्या आईनेही शेवटचा श्वास घेतला. कोवळ्या वयात ओंकारवर आयुष्यात ही परिस्थिती ओढवली.

मामा-मामींनी उचलला पोषणाचा ‘भार’
आई-वडिलांच्या निधनानंतर पोरक्या झालेल्या ओंकारला मामा ज्ञानेश्वर ओतारी यांनी मोलाचा आधार दिला. या वेळी त्यांच्या पत्नीनेही त्यांना चांगली साथ दिली. मामा-मामींनी ओंकारच्या पालनपोषणासह शिक्षणाचाही ‘भार’ उचलला. प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या बळावर ओंकारने ज्ञानेश्वर ओतारी यांनी दिलेल्या संस्काराचे चीज केले. मामा-मामींच्या मायेच्या छत्राखाली त्याने शिक्षणासह वेटलिफ्टिंगचाही आपला छंद जोपासला. याशिवाय त्याने बी. कॉम.पर्यंतचे पदवी शिक्षण पूर्ण केले. तसेच त्यानंतर त्याला रेल्वेतही नोकरी मिळवली.

1-1-11 ला साधला विलक्षण योगायोग
ओंकार ओतारीने तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय धावपटू असलेल्या कुरुंदवाडच्या नम्रता दळवी यांच्यासोबत 2011 मध्ये लग्न केले. या वेळी ओंकारने 1-1-11 या दिवशी विवाह सोहळ्याचा विलक्षण असा योगायोग जुळवून आणला. या दोघांच्या संसाररूपी वेलीवर आता एक फूलही उमलले आहे.

सरावासह प्रशिक्षणाचा वसा
गत 2010 पासून रेल्वेत क्लार्कपदावर कार्यरत असलेला ओंकारने पुण्याच्या बालेवाडीत राष्ट्रकुल स्पर्धेची तयारी केली. या वेळी त्याने आपल्या नित्याच्या सरावाबरोबरच नवोदित खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची भूमिकाही पार पाडली. या वेळी त्याने केलेल्या मार्गदर्शनाचा युवा खेळाडूंनाही चांगला फायदा झाला.