आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर चार गडी राखून विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - तिरंगी मालिकेतील पहिल्याच सामन्यात अटीतटीच्या लढतीत भारताचा ऑस्ट्रेलियाने चार गडी राखून पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फिंचच्या 96 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा विजय मिळवला.
भारतीय फलंदाजांनी केलेल्या 268 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने केवळ दोन विकेट गमावत 200 धावांचा टप्पा ओलांडला. त्यामुळे भारताचा पराभव होणार असे चित्र दिसत होते. पण त्यानंतर गोलंदाजांनी आणखी चार फलंदाजांना माघारी पाठवत सामन्याचे चित्र पालटवले. त्यामुळे अखेरच्या षटकांपर्यंत अगदी अटीतटीची लढत निर्माण झाली होती.
अक्षर पटेलने वॉटसनचा त्रिफळा उडवत कांगारुंची महत्त्वाची भागीदारी मोडीत काढली. त्याआधी उमेश यादवने वॉर्नरला बाद करत भारताला पहिली विकेट मिळवून दिली होती. पण कांगारुंनी चांगली फलंदाजी करत सामन्यावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तिस-या विकेटसाठी फिंच आणि स्मिथ यांनी 85 धावांची भागीदारी केली. पण त्यानंतर स्मिथ पाठोपाठ फिंच, बेली आणि मॅक्सवेल लवकर बाद झाल्याने कांगारुंचा विजय कठीण झाला होता. पण फॉकनरने विजय निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेली खेळी केली.


भारतीय फलंदाजीवर स्टार्कचा 'षटकार' भारी
ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्कने रोहित शर्मासह भारताचे महत्त्वाचे सहा फलंदाज बाद केले. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने भारताला 267 वर रोखले. नाणेफेक जिंकून मैदानात उतरलेल्या टीम इंडियाचे 59 धावांवर तीन विकेट पडल्या होत्या. त्यानंतर रोहित शर्माने सुरेश रैना आणि धोनीसोबत भारताला सन्मानजनक स्कोअरवर पोहोचविले.

भारताकडून रोहित शर्मा (138) व सुरेश रैनाने (51) शानदार खेळी केली. भारताने निर्धारित 50 षटकात आठ गडी गमावत 267 धावा केल्या. आर. अश्विन आणि मो. शमी नाबाद राहिले. ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कने भारताचे सहा फलंदाज बाद केले तर ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणार्‍या भारतीय वंशाच्या गुरुविंदर संधूने कारकिर्दीतील पहिली विकेट मिळविली.

रोहितचे शानदार शतक
एकीकडे भारताचे फलंदाज झटपट बाद होत असताना रोहित शर्मा (138 )मैदानावर पाय रोवून उभा राहिला आणि भारताचा धावफलक हलता ठेवला. त्याला सुरेश रैनाने चांगली साथ दिली. रैनाचे अर्धशतक आणि रोहितचे शतक मागेपुढेच पूर्ण होणार असे वाटत असतानाच वैयक्तिक 51 धावांवर रैना बाद झाला. त्यानंतर कर्णधार धोनी मैदानात आला. रोहितने 109 चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. त्याने नऊ चौकार आणि चार षटकारांनी सजलेली 138 धावांची शानदार खेळी केली.
स्टार्कने भारताची पहिली जोडी फोडली
भारताला पहिला धक्का सलामीवीर शिखर धवनच्या रुपाने बसला. ऑस्ट्रेलियाच्या फॉर्मात असलेल्या मिचेल स्टार्कने आरोन फिंचकडून धवनला झेलबाद केले. धवन पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर दोन धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या भारतीय वंशाच्या गुरिंदर संधूने राहाणेला बाद करुन कारकीर्दीला सुरुवात केली. अजिंक्य राहाणे 12 धावांवर परतला. त्यानंतर विराट कोहलीच्या रुपाने भारताची तिसरी विकेट पडली. विराटने फक्त 9 धावांवर बाद झाला.

असे आहेत दोन्ही संघ

भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, आर. अश्विन, अक्षर पटेल, मो. शमी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव.
ऑस्ट्रेलिया : जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अॅरोन फिंच, शेन वॉटसन, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, ब्रेड हॅडिन, जेम्स फ्युकनर, मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स, गुरविंदर संधू.

फोटो - शतकी खेळी करणारा रोहित शर्मा.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, सामन्याचा रोमांच