ऑकलंड - कर्णधार ब्रॅडन मॅक्लुमने (224) घरच्या मैदानावर तुफानी फटकेबाजी करत शानदार द्विशतक झळकावले. या धडाकेबाज खेळीच्या बळावर यजमानांनी भारताविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 503 धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात आता टीम इंडियाकडून रोहित शर्मा (नाबाद 67) आणि अजिंक्य रहाणेला (नाबाद 23) मोठा संघर्ष करावा लागत आहे. टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात झाली. या टीमने 4 बाद 130 धावा काढल्या. अद्याप टीम इंडिया 373 धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे शनिवारी भारतासमोर तिस-या दिवशी अधिकाधिक धावा काढण्याचे मोठे आव्हान असेल.
न्यूझीलंडच्या मोठ्या धावसंख्येमुळे बॅकफुटवर पडलेल्या टीम इंडियाने गोलंदाजीपाठोपाठ फलंदाजीतही निराशाजनक कामगिरी केली. यात शिखर धवन (0), मुरली विजय (26), चेतेश्वर पुजारा (1) आणि विराट कोहली (4) हे आघाडीचे चारही फलंदाज सपशेल अपयशी ठरले. शिखर धवनने यापूर्वी वनडे मालिका आणि सराव सामन्यातही सुमार कामगिरी केली होती.
मॅक्लुम-कोरीची शतकी भागीदारी
न्यूझीलंडकडून मॅक्लुम आणि कोरी अॅँडरसनने पाचव्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी केली. मात्र, ईशांत शर्माने ही जोडी फोडली. त्याने अॅँडरसनला (77) बाद केले. त्यानंतर एका टोकाने मॅक्लुमने धावांचा पाऊस पाडला. मात्र, या वेळी त्याला साथ देणा-या फलंदाजांना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी तंबूत पाठवले.
दरम्यान, टीम साऊथीने 28, भारतीय वशांच्या ईश सोढीने 23 धावांचे योगदान दिले. त्याला ईशांतने बाद केले.
ईशांतचा ‘विकेट’चा षटकार
न्यूझीलंडने पहिल्या डावात 503 धावांची खेळी केली. दरम्यान, भारताचे सर्वच गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्यातील प्रत्येकाने 100 पेक्षा अधिक धावा दिल्या. यात ईशांतने 134 धावा देताना 6 विकेट घेतल्या. त्यापाठोपाठ जहीरने 132 धावा देऊन दोन गडी बाद केले. जडेजाने 120 धावा देऊन एकच विकेट मिळवली. मो. शमीने 95 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली.