ऑकलंड- पहिल्या डावात 301 धावांनी पिछाडीवर पडलेल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करीत न्यूझीलंडचा दुसरा डाव केवळ 105 धावांत गुंडाळत त्यांची भंबेरी उडवली. न्यूंझीलंडने पहिल्या डावात कर्णधार ब्रेंडन मॅकुल्लमच्या द्विशतकामुळे 503 धावांचा डोंगर उभारला होता. त्याला उत्तर देताना भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्याने 202 धावांत डाव आटोपला.
301 धावांनी पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाला फॉलोऑन न देता न्यूझीलंडने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र न्यूझीलंडच्या कर्णधाराचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी चुकीचा ठरवला व त्यांचा दुसरा डाव 41.2 षटकांत केवळ 105 धावांवर गुंडाळला. भारताला ही कसोटी जिंकण्यासाठी आता 407 धावा कराव्या लागणार आहेत. सामन्याचे अडीच दिवस अजून बाकी आहेत. भारतीय फलंदाजांनी पहिल्या डावात केलेल्या चुका टाळल्या व खेळपट्टीवर तळ ठोकला तर अडीच दिवस असल्याने कसोटी जिंकण्याचा पराक्रम करण्याची संधी संघाला आहे. मात्र हे सारे आघाडीच्या फलंदाजांवर अवलंबून आहे. दुस-या डावात भारताने 25 षटकात 1 बाद 87 अशी मजल मारली आहे. तिस-या दिवसअखेर सलामीवीर शिखर धवन ( 49) आणि चेतेश्वर पुजारा (22 ) खेळपट्टीवर होते. मुरली विजय 13 धावा काढून बाद झाला.
सामन्याचे अजून दोन दिवस असून भारताला अद्याप 320 धावांची गरज आहे. त्यामुळे पहिलीच कसोटी रंगतदार अवस्थेकडे झुकली आहे.
महंमद शमी, इशांत शर्मा यांनी प्रत्येकी तीन, तर झहीर खानने 2 गडी टिपले. जडेजाने टीम साऊदीला बाद करतानाच कर्णधार मॅकल्लुमला धावचित करीत न्यूझीलंडला गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याआधी किवी गोलंदाजांनी भारताचा डाव 202 धावांत गुंडाळला. रोहित शर्माने सर्वाधिक 72 धावा केल्या. रविंद्र जडेजाने नाबाद 30 धावा काढत भारताला दोनशेचा टप्पा गाठून दिला. मुरली विजय (26), अजिंक्य रहाणे (26), झहीर खान (14) आणि कर्णधार धोनीने 10 धावांचे योगदान दिले. शिखर धवन (0), पुजारा (1), विराट कोहली (4) हे आघाडीचे फलंदाज फ्लॉप ठरले.
पुढे छायाचित्राच्या माध्यमातून पाहा, किवींची कशी दाणादाण उडवली भारतीय गोलंदाजांनी...