आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामीरपूर - सलामीवीर शिखर धवन (60) आणि अजिंक्य रहाणे (56) यांच्या 121 धावांच्या शतकी भागीदारीच्या बळावर भारताने दुबळ्या अफगाणिस्तानवर सहजपणे 8 गड्यांनी विजय मिळवला. मात्र, टीम इंडियासाठी हा विजय निरर्थक ठरला. भारत यापूर्वीच आशिया चषकाच्या फायनलमधून बाहेर झाल्याने या सामन्याच्या निकालाने विशेष परिणाम झाला नसता. यामुळे या सामन्यात अखेरपर्यंत रोमांच दिसला नाही. स्पर्धेत भारताचा हा दुसरा विजय ठरला.
अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 159 धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारताने 32.2 षटकांत 2 बाद 160 धावा काढून सहज विजय मिळवला. दिनेश कार्तिक 21 आणि रोहित शर्मा 18 धावा काढून नाबाद राहिले. भारताने या सामन्यासाठी अंतिम अकरा खेळाडूंत बदल केला नाही. मात्र, सलामीला रोहित शर्माच्या जागी अजिंक्य रहाणेला आजमावण्यात आले. अजिंक्य रहाणेने अर्धशतक ठोकून कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. रहाणेने 66 चेंडूंचा सामना करताना 5 चौकारांच्या मदतीने 56 धावा काढल्या. धवनने 70 चेंडूंत 60 धावा काढल्या. या खेळीत त्याने 1 षटकार आणि 4 चौकार मारले.
अवघ्या 95 धावांत अफगाणच्या 7 विकेट पडल्या होत्या. यानंतर समिउल्ला शेनवारीने (50) तळाच्या फलंदाजांसह महत्त्वाची कामगिरी करताना संघाला सन्मानजनक स्कोअर उभा करून दिला. शेनवारीने 73 चेंडंूचा सामना करताना 1 षटकार आणि 6 चौकारांच्या साह्याने आपली खेळी साकारली. त्याने अफगाणकडून सर्वाधिक 50 धावा काढल्या. स्पर्धेत हे त्याचे दुसरे अर्धशतक ठरले. यापूर्वी त्याने यजमान बांगलादेशविरुद्ध 81 धावा काढल्या होत्या. शेनवारीशिवाय अफगाणकडून नूर अली झारदानने 31 आणि मो. शाहजादने 22 धावांचे योगदान दिले. या तिघांशिवाय इतर एकाही फलंदाजाला दोनअंकी धावसंख्या गाठता आली नाही.
जडेजाच्या 4 विकेट
तत्पूर्वी, भारतीय कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. प्लेअर ऑफ द मॅच ठरलेल्या रवींद्र जडेजाने 30 धावांत 4 गडी बाद केले. ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने 31 धावांत तिघांना टिपले. या दोघांच्या घातक गोलंदाजीच्या बळावर भारताने अफगाणला अखेरच्या सामन्यात 45.2 षटकांत 159 धावांत रोखले.
121 धावांची भागीदारी धवन-रहाणेची
60 धावा शिखर धवनने काढल्या.
56 धावांचे योगदान रहाणेने दिले.
04 विकेट घेणारा जडेजा सामनावीर
मो. शमीच्या 50 विकेट पूर्ण
भारताकडून जडेजा आणि अश्विनशिवाय मो. शमीने 50 धावांत 2 विकेट, तर अमित मिश्राने 21 धावांत एक विकेट घेतली. शमीने यादरम्यान आपल्या वनडे कारकीर्दीत 50 बळी पूर्ण केले. ही आकडेवारी गाठणारा तो भारताचा 31 वा गोलंदाज ठरला आहे.
पुजारा, पांडेला संधी नाहीच
टीम इंडियाचा प्रभारी कर्णधार विराट कोहली अफगाणिस्तानसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध युवा खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि वेगवान गोलंदाज ईश्वर पांडे यांना अंतिम अकरा खेळाडूंत संधी देईल, असे वाटत होते. हा सामना निकालाच्या हिशेबाने तसा महत्त्वाचा राहिला नव्हता. यामुळे बेंचवर बसलेल्या खेळाडूंना संधी देणे शक्य होते. मात्र, या दोन्ही खेळाडूंना संधी मिळाली नाही. मध्य प्रदेशच्या ईश्वर पांडेने 31 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 131 बळी घेतले आहेत. न्यूझीलंड दौ-यात त्याला फक्त एकच सराव सामना खेळण्याची संधी मिळाली होती. या वेळी कोहलीने पांडे आणि पुजाराला एकही संधी दिली नाही. अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीला एका सामन्यात संधी मिळाली होती.'
विजयी चौकाराचे लंकेचे लक्ष्य
गुरुवारी बांगलादेश आणि श्रीलंकेदरम्यान सामना होईल. श्रीलंकेने यापूर्वी फायनलमध्ये स्थान मिळवले आहे. लंकेने स्पर्धेतील तिन्ही सामने जिंकून दणदणीत कामगिरी केली. आता स्पर्धेत विजयी चौकार मारण्यासाठी लंकेचे खेळाडू प्रयत्नशील असतील. दुसरीकडे स्पर्धेत पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न बांगलादेशचा असेल. घरच्या मैदानावर बांगलादेशला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही.
धावफलक
अफगाणिस्तान धावा चेंडू 4 6
नूर झे. कोहली गो. जडेजा 31 35 6 0
मंगल त्रि. गो. शमी 05 16 1 0
रहमत शहा पायचीत गो. जडेजा 09 23 1 0
असगर झे. मिश्रा गो. जडेजा 05 07 0 0
नजिबुल्लाह झे. बिन्नी गो. आश्विन 05 14 0 0
नबी झे. कार्तीक गो. जडेजा 06 20 0 0
शाहजाद पायचीत गो. आश्विन 22 28 2 1
शेनवारी पायचीत गो. शमी 50 73 6 1
अश्रफ झे. कोहली गो. मिश्रा 09 26 0 0
शापूर झद्रान पायचीत गो. आश्विन 01 13 0 0
डी. झद्रान नाबाद 02 17 0 0
अवांतर : 14. एकूण : 45.2 षटकांत सर्वबाद 159 धावा. गडी बाद होण्याचा क्रम : 1-30, 2-54, 3-55, 4-60, 5-64, 6-83, 7-95, 8-111, 9-137, 10-159. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार 8-1-25-0, मो. शमी 7.2-0-50-2, अमित मिश्रा 10-1-21-1, रवींद्र जडेजा 10-1-30-4, आर. आश्विन 10-3-31-3.
भारत धावा चेंडू 4 6
रहाणे पायचीत एम. अश्रफ 56 66 5 0
धवन त्रि. गो. मोहंमद नबी 60 78 4 1
रोहित शर्मा नाबाद 18 24 1 0
दिनेश कार्तिक नाबाद 21 27 3 0
अवांतर : 05. एकूण : 32.2 षटकांत 2 बाद 160 धावा. गडी बाद होण्याचा क्रम : 1-121, 2-123. गोलंदाजी : मो. नबी 10-0-30-1, शापूर झद्रान 6-0-25-0, दौलत झद्रान 5-0-25-0, शेनवारी 4.2-0-32-0, एम. अश्रफ 5-0-26-1, रहमत शहा 2-0-21-0. सामनावीर : रवींद्र जडेजा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.