आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE India Vs West Indies T20 World Cup 2014 Score In Marathi

T-20 WC : भारताचा सलग दुसरा विजय; वेस्ट इंडीजवर 7 गड्यांनी मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीरपूर - रविवारी वर्ल्डकप टी-20 मध्ये चमत्कारच झाला. भारतीय गोलंदाजांनी कात टाकून वेस्ट इंडीजविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी केली. गोलंदाजांच्या पराक्रमानंतर रोहित शर्मा (नाबाद 62) आणि विराट कोहली (54) यांच्या अर्धशतकांच्या बळावर टीम इंडियाने गतविजेत्या वेस्ट इंडीजला 7 गड्यांनी पराभूत केले. 18 धावांत 2 गडी बाद करणारा अमित मिश्रा सामन्याचा मानकरी ठरला. वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 129 धावा काढल्या. भारताने हे लक्ष्य 7 गड्यांच्या मोबदल्यात गाठले. भारताचा पुढचा सामना 28 मार्च रोजी बांगलादेशसोबत होईल.

टीम इंडियाचा कर्णधार धोनीने टॉस जिंकून वेस्ट इंडीजला प्रथम फलंदाजीस बोलावले. भारतीय गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. रवींद्र जडेजा (48 धावांत 3 विकेट), अमित मिश्रा (18 धावांत 2 विकेट), आर. अश्विन (24 धावांत 1 विकेट) भुवनेश्वर कुमार (3 षटकांत फक्त 3 धावा) यांनी धारदार गोलंदाजी करून वेस्ट इंडीजला अवघ्या 129 धावांवर रोखले.

रोहित-कोहलीची अर्धशतके
धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. धावफलकावर एकच धाव लागली असताना शिखर धवन शून्यावर बाद झाला. बद्रीने त्याला पायचीत केले. यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी दुसर्‍या विकेटसाठी 106 धावांची शतकी भागीदारी करून सामन्याचे चित्र बदलले. रोहितने 55 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार आण 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 62 धावा काढल्या. कोहलीने 41 चेंडूंत 1 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 54 धावा काढल्या. कोहलीला रसेलने त्रिफळाचीत केले. विजयासाठी एका धावेची गरज असताना युवराजसिंगला (9) सॅम्युअल्सने स्लिपमध्ये गेलकरवी झेलबाद केले. यानंतर आलेल्या सुरेश रैनाने विजयी चौकार खेचून टीम इंडियाला जल्लोषाची संधी दिली. सलग दोन विजयांनंतर भारत ब गटात 4 गुणांसह अव्वलस्थानी असून पाकिस्तान (2 गुण) दुसर्‍या क्रमांकावर आहे.

विंडीजचे अपयश
भारतीय गोलंदाजांनी विंडीजच्या फलंदाजांना मनसोक्त फलंदाजी करू दिली नाही. विंडीजकडून गेल (34), लेंडल सिमन्स (27) यांनीच संघर्ष केला.

धोनीचा विक्रम
धोनीने आंतररराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 127 वे यष्टिचीत करून वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली. सध्या हा विक्रम कुमार संगकाराच्या नावे आहे.