आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE IPL 8, 2nd Match: Chennai Super Kings V Delhi Daredevils At Chennai

चेन्नई सुपरकिंग्जची दिल्ली डेअरडेव्हिल्सवर अवघ्या एका धावेने मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - फलंदाजांच्या चिवट कामगिरीनंतर गोलंदाजांच्या दमदार प्रदर्शनाच्या बळावर अखेरच्या चेंडूपर्यंत रोमांचक ठरलेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर अवघ्या एका धावेने मात केली. ३ गडी बाद करणारा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. दिल्लीकडून एल्बी मोर्केलची (नाबाद ७३) झुंजार अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १५० धावा काढल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने ९ बाद १४९ धावा काढल्या.

अखेरच्या ६ चेंडूत दिल्लीला विजयासाठी १९ धावांची गरज होती. त्या वेळी गोलंदाज ब्राव्हो तर फलंदाजीस मोर्केल आणि ताहिर होते. या चेंडूवर अनुक्रमे ४,१, ० (ताहिर बाद), ६, २, ४ अशा एकूण १७ धावा निघाल्या. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी ६ धावांची गरज असताना मोर्केलने षटकाराऐवजी चौकार मारला. दिल्लीकडून मोर्केलने एकाकी झुंज देताना ५५ चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ७३ धावा काढल्या. याशिवाय केदार जाधवने २० चेंडूंत २० धावा, तर सलामीवीर मयंक अग्रवालने १२ चेंडूंत १५ धावांचे योगदान दिले. या तिघांशिवाय इतर फलंदाजांनी खेळपट्टीवर फक्त हजेरी लावण्याचे काम केले. दिल्लीचा युवराजसिंग ९, तर कर्णधार डुमिनी ५ धावा काढून बाद झाले.

तत्पूर्वी, चेन्नईने २० षटकांत ७ बाद १५० धावा केल्या. पहिल्याच षटकात सणसणीत चार चौकार खेचणाऱ्या स्मिथने ३१ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या. ब्रेंडन मॅक्लुम (४) आणि सुरेश रैना (४) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर डुप्लेसिसने ३२ आणि धोनीने ३० धावा जोडल्या.

आज राजस्थानपुढे पंजाब
शुक्रवारी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झुंज रंगेल. किंग्ज इलेव्हन पंजाबची टीम मागच्या स्पर्धेतील उपविजेता आहे. मागच्या आयपीएलमध्ये पंजाबने दोन वेळा राजस्थानला पराभूत केले होते. दोन्ही संघांचा सामना म्हणजे ऑस्ट्रेलियन खेळाडूंची एकमेकांविरुद्ध झुंज, असे समीकरण आहे. कारण, या दोन्ही संघांकडून सर्वाधिक ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत. दोघांचे कर्णधारही कांगारू आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, सामन्यातील काही खास फोटो...