आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • LIVE IPL 8, 49th Match: Delhi Daredevils V Chennai Super Kings At Raipur, May 12, 2015

दिल्लीचा चेन्नईला दणका; डेअरडेव्हिल्सने सुपरकिंग्सवर सहा विकेटने मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर- प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर झालेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सने गुणतालिकेत नंबर असलेल्या चेन्नई सुपरकिंग्जला दणका दिला. रायपुरात झालेल्या लढतीत दिल्लीने चेन्नईवर ६ विकेटने मात केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईला दिल्लीच्या गोलंदाजांनी अवघ्या ११९ धावांवर रोखले. यानंतर १६.४ षटकांत ४ बाद १२० धावा काढून दिल्लीने शानदार विजय मिळवला. या विजयानंतर दिल्लीचे १० गुण झाले आहेत.

विजयासाठी आवश्यक असलेल्या धावांचा पाठलाग करताना दिल्लीकडून सलामीवीर श्रेयस अय्यरने ४९ चेंडूंत १० चौकार, १ षटकारासह नाबाद ७० धावा ठाेकल्या. मधल्या फळीत युवराजसिंगने २८ चेंडूंत १ षटकार, ४ चौकारांसह ३२ धावा काढल्या. डी.कॉक (०), डुमिनी (६), मोर्कल (८) हे फलंदाज लवकर बाद झाले. चेन्नईकडून पी. नेगीने २८ धावांत २ गडी बाद केले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून चेन्नई सुपरकिंग्जने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने २० षटकांत ६ बाद ११९ धावा काढल्या. चेन्नईची सुरुवात गचाळ झाली. त्यांच्या तीन विकेट ५० धावांच्या आतच पडल्या. टीम इंडियातून बाहेर असलेल्या वेगवान गोलंदाज जहीर खानने सलामीवीर ब्रेंडन मॅक्लुमला (११) बाद केले. यानंतर एल्बी मॉर्केलने डेवेन स्मिथची (१८) विकेट काढली. स्मिथने २४ चेंडूंत २ चौकार आणि एक षटकार खेचला. स्मिथ बाद झाल्यानंतर आलेला सुरेश रैनादेखील मोठी खेळी करू शकला नाही. तिसऱ्या विकेटच्या रूपात तो ११ धावांवर तंबूत परतला. चेन्नईची १० षटकांत ३ बाद ४६ धावा अशी स्थिती होती. कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि फॉफ डुप्लेसिसने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या जोडीने चौथ्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी रचली. प्लेसिसला बाद करत मॉर्केलने आपली दुसरी विकेट घेतली. प्लेसिसने २३ चेंडूंचा सामना करताना सर्वाधिक २९ धावा केल्या. धोनी २७ धावांवर असताना जहीर खानचा बळी ठरला. धोनीने या खेळीत ३ चौकार आणि १ षटकार लगावला. दिल्लीकडून जहीर खानने ४ षटकांत अवघ्या ९ धावा देत २ गडी बाद केले. त्याने एक षटक निर्धावदेखील टाकले. मॉर्केलने २१ धावांत २ बळी घेतले.

झॅक इज बॅक
दिल्ली डेअरडेव्हिल्सचा वेगवान गोलंदाज जहीर खानने जबरदस्त पुनरागमन केले. त्याने ४ षटके, १ निर्धाव, ९ धावा आणि २ विकेट...अशी टी-२०च्या खेळात अशक्यप्राय वाटणारी शानदार गोलंदाजी केली. जहीरने चेन्नईचा धोकादायक फलंदाज ब्रेंडन मॅक्लुम आणि कर्णधार जहीर खान यांच्या विकेट घेतल्या. जहीर खानच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला.

श्रेयस अय्यरची नाबाद झुंज
विजयासाठी अावश्यक असलेल्या १२० धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा सलामीवीर श्रेयस अय्यरने नाबाद ७० धावा ठोकल्या. चेन्नईच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजांसमोर त्याने ४९ षटकांत १ षटकार, १० चौकारांसह ही खेळी केली. त्याने युवराजसिंगसोबत महत्वपूर्ण अशी ६९ धावांची भागीदारी केली. अखेरपर्यंत नाबाद राहून त्याने दिल्लीला विजय मिळवून दिला.