आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE IPL 8, 4th Match: Chennai Super Kings V Sunrisers Hyderabad At Chennai

CSK vs SRH: चेन्नईची हैदराबादवर 45 धावांनी मात, मॅक्यूलम चमकला!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - शनिवारचा दिवस आणि चेन्नईचे चेपॉकचे स्टेडियम गाजवले ते चेन्नई सुपरकिंग्सचा सलामीवीर ब्रेंडन मॅक्लुमच्या (नाबाद १००) तुफानी फलंदाजीने. मॅक्लुमच्या वादळासमोर सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांची अवस्था "सळो की पळो' सारखी झाली होती. मॅक्लुमच्या शतकानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (५३) अर्धशतकानंतर गोलंदाजांच्या दमदार प्रदर्शनाच्या बळावर चेन्नईने हैदराबादला ४५ धावांनी हरवले. चेन्नईचा हा स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला आहे. या विजयाने धोनीच्या संघाने गुणतालिकेत अव्वलस्थान काबीज केले आहे. दुसरीकडे आयपीएल-८च्या आपल्या पहिल्या लढतीत हैदराबादला विजय मिळवता आला नाही. शतकवीर मॅक्लुमच सामनावीर ठरला.

चेन्नईने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टॉसपासून तर अखेरच्या निकालापर्यंत सर्वकाही या सामन्यात चेन्नईच्या मर्जीप्रमाणेच घडले. चेन्नईच्या सलामीवीरांनी ८.१ षटकांत ७५ धावांची मजबूत सलामी दिली. डेवेन स्मिथ २७ धावा काढून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रैनाने १४ धावांचे योगदान दिले. हे दोघेही धावबाद होऊन परतले. रैनाच्या १३५ च्या स्कोअरवर बाद झाला. यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अवघ्या २९ चेंडूंत ४ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ५३ धावांचा पाऊस पाडला. मॅक्लुम आणि धोनी या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. धोनीला न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम बोल्टने बाद केले. वॉर्नरने त्याचा झेल घेतला. धोनी बाद झाला तेव्हा चेन्नईच्या १९.२ षटकांत १९८ धावा होत्या. रवींद्र जडेजाही शून्यावर परतला. ब्राव्हो शून्यावर नाबाद राहिला. सलामीला आलेला मॅक्लुमने स्वत:चे शतक पूर्ण करीत चेन्नईला दोनशेच्या पुढे पोहोचवले. गोलंदाजीत हैदराबादकडून एकमेव विकेट बोल्टला मिळाली. इतरांनी सपशेल निराशा केली.

धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवात चांगली झाली. धवन-वॉर्नरने ३० धावांची सलामी दिली. धवन २६ धावा काढून बाद झाला. मोहित शर्माने त्याला बाद केले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या के. राहुलने ५ धावा काढून फक्त हजेरी लावण्याचे काम केले. मोहितने त्याला त्रिफळाचित केले. नमन ओझाने ११ चेंडूंत १५ धावांचे योगदान दिले. रवी बोपराने २२ तर केन विल्यम्सनने नाबाद २६ धावा काढल्या. विल्यम्ससन सहाव्या क्रमांकावर खेळण्यास आला आणि नाबाद राहिला. त्याला मागे पाठवून हैदराबादने चूक केली. इतर फलंदाजांनी हजेरी लावण्याचे काम केले. चेन्नईकडून मोहित शर्मा आणि ब्राव्हो यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

मॅक्लुम नावाचे वादळ...!
स्फोटक फलंदाजी आणि मॅक्लुम हे गणित जणू ठरलेलेच आहे. नुकत्याच झालेल्या वर्ल्डकपमध्ये मॅक्लुमने तुफानी फलंदाजी करून आपल्या टीमला फायनलमध्ये पोहोचवले होते. हेच मॅक्लुम नावाचे वादळ शनिवारी चेन्नईत अवतरले. मॅक्लुमने तुफानी फलंदाजी करताना अवघ्या ५६ चेंडूंत नाबाद १०० धावा ठोकल्या. यात तब्बल ९ षटकार, ७ चौकारांचा पाऊस पाडला. १७८.५७ असा खतरनाक स्ट्राइक रेट त्याचा होता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, सामन्यातील काही खास फोटो...