अॅडिलेड - येथील ओव्हल स्टेडियमवर सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने भारतीय संघाला कडवी झुंज देत शतक पूर्ण केले. दुसर्या डावात वॉर्नरच्या शतकी खेळीच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने 363 रन्सची मजबूत आघाडी घेतली. पहिल्या डावात त्यांची 73 रन्सची लिड होती. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने दुसर्या डावात 5 बाद 290 रन्स केले. स्टिव्हन स्मिथ (52) आणि ब्रॅड हॅडिन (14) नाबाद आहेत.
जुळ्या शतकानंतर वॉर्नर बाद
सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने पहिल्या डावा प्रमाणेच दुसर्या डावातही शतक झळकावले. जुळ्या शतकांचा हा कारनामा त्याने दुसर्यांदा केला आहे. याआधी 1 मार्च 2014 रोजी साऊथ अफ्रिकेविरुद्ध केपटाऊन येथे झालेल्या कसोटीत त्याने 135 आणि 145 रन्सची शानदार खेळी केली होती. आज करण शर्माने त्याला 102 रन्सवर क्लिन बोल्ड केले.
शतक पूर्ण झाल्यानंतर काही वेळातच त्याचा
टीम इंडियाचा कर्णधार
विराट कोहलीसोबत वाद झाला. कोहली स्टिव्हन स्मिथला काही सांगत होता, तेव्हा विराटचा आवाज चढला. त्याचवेळी वॉर्नरने कोहलीला मागे राहाण्यास सांगितले. त्यानंतर विराटचा पारा वाढला आणि त्याने वॉर्नरला
आपल्या मर्यादेत राहा, असे सुनावले.
मार्शचा ब्लास्ट
मार्शने झटपट बॅटिंग केली. त्याने करण शर्माच्या गोलंदाजीवर तीन षटकार आणि एक चौकार लगावला. त्याने 25 चेंडूत 40 रन्स केले. रोहीत शर्माच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला.
क्लार्क झाला फेल
वरुण आरोनने वॉर्नरसोबतचा वाद विसरुन चांगले पुनरागमन केले. त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कची महत्वाची विकेट मिळविली. पहिल्या डावात शतक झळकवणारा क्लार्क केवळ 7 धावांवर तंबूत परतला.
शमीने दिला दुसरा झटका
भारतीय संघाला दुसरे यश मोहम्मद शमीने मिळवून दिले. त्याने शेन वॉटसनचा त्रिफळा उडवला. तेव्हा वॉटसन 33 धावांवर खेळत होता. वॉटसनने वॉर्नरसोबत दुसर्या विकेटसाठी 102 रन्सची भागीदारी केली.
वॉर्नर आणि धवनचे उडाले खटके
पहिल्या कसोटीचे पहिले तीन दिवस शांततेत पार पडल्यानंतर चौथ्या दिवशी वाद-विवाद पाहायला मिळाले. वरुण आरोनने वॉर्नरचा त्रिफळा उडविला. यामुळे युवा खेळाडू वरुण उत्साहित झाला आणि त्याने मैदानात जोरदार आरोळी ठोकून आनंद साजरा केला. पंचाने नो बॉल आहे का हे तपासले आणि तो नोबॉल असल्याचा इशारा केला. तोपर्यंत वॉर्नर क्रिज सोडून सीमारेषेपर्यंत पोहोचला होता. नोबॉल असल्यामुळे पंचाने त्याला बॅटिंगसाठी परत बोलावले. परत येताना वॉर्नरने आरोनला शांत राहाण्यास सांगितले. यामुळे भारतीय खेळाडू शिखर धवन चिडला आणि वॉर्नरसोबत त्याचा वाद झाला. पंचांना मध्यस्थी करुन त्या दोघांमधील वाद मिटवावा लागला.
कर्णधार विराट कोहलीने लंच नंतर सुरु झालेल्या सत्रात दोन्ही बाजूने फिरकीचा मारा सुरु केला. त्याचा फायदा रॉजर्सच्या विकेटच्या माध्यमातून मिळाला.