आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE T 20 World Cup : Bangladesh Vs Afghanistan Match In Marathi

वर्ल्डकप टी-20 : बांगलादेशची विजयी सलामी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीरपूर - गोलंदाजांच्या टिच्चून मार्‍यानंतर फलंदाजांच्या बहारदार कामगिरीच्या बळावर यजमान बांगलादेशने वर्ल्डकप टी-20 पात्रता फेरीच्या सामन्यात पाहुण्या अफगाणिस्तानवर 9 गड्यांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह बांगलादेशने मुख्य फेरीतील प्रवेशाकडे आगेकूच केली आहे.

यजमानांच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करताना अफगाणिस्तानला 17.1 षटकांत अवघ्या 72 धावांत गुंडाळले. यानंतर बांगलादेशने 12 षटकांत एक बाद 78 धावा काढून सहज विजय मिळवला. बांगलादेशकडून सकिब-अल-हसनने शानदार गोलंदाजी करताना 3.1 षटकांत अवघ्या 8 धावांच्या मोबदल्यात 3 गडी बाद केले. त्याच्याशिवाय अब्दुल रज्जाकने 20 धावांत 2 गडी पॅव्हेलियनमध्ये परतवले. मुशर्रफ मुर्तुजाने 8 धावांत 1 विकेट, मोहंमुदुल्लाहने 8 धावांत 1 विकेट तर फरहाद रेजाने 2 धावांत 1 गडी बाद केला. या गोलंदाजांच्या दमदार प्रदर्शनापुढे अफगाणच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही. अफगाणिस्तानकडून गुलबदीन नईबने सर्वाधिक 21 धावा काढल्या. याशिवाय शफिकउल्लाने 16 आणि करीम सादिकने 10 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांना तर दोनअंकी धावसंख्यासुद्धा गाठता आली नाही. अफगाणला तर पूर्ण 20 षटकेसुद्धा खेळता आली नाहीत. त्यांचा डाव अवघ्या 17.1 षटकांतच आटोपला.

अनामुल चमकला
विजयासाठी धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने सहज विजय मिळवला. सलामीवीर अनामुल हकने नाबाद 44 धावा काढल्या. त्याने 33 चेंडूंचा सामना करताना 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने ही खेळी केली.

दुसरा सलामीवीर तामिम इक्बालने 21 धावांचे योगदान दिले. तामिमने 27 चेंडूंत 2 चौकारांच्या साह्याने ही खेळी साकारली. तामिम इक्बालला शमिउल्ला शेनवरीने पायचीत केले. ही एकमेव विकेट यजमान संघाने गमावली. तिसर्‍या क्रमांकावर खेळण्यास आलेल्या सकिब-अल-हसनने नाबाद 10 धावा काढल्या. त्याने 12 चेंडूंचा सामना करताना एका चौकाराच्या मदतीने ही खेळी साकारली. सकिबने सामन्यात अष्टपैलू कामगिरी करीत विजयात सिंहाचा वाटा उचलला.

खेळपट्टीची मदत
आज खेळपट्टीकडून छान मदत झाली. मी चांगली गोलंदाजी केली आणि संघाच्या विजयासाठी कामी येऊ शकलो, याचे मला समाधान आहे. पुढच्या सामन्यातही अशीच कामगिरी करून संघाला विजय मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल.
- सकिब-अल-हसन, सामनावीर.