आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोढा समिती-बीसीसीआयमध्ये बँक खात्यावरून रंगले वाक‌्युद्ध!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोढा समिती आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आता समोरासमोर आले आहेत. लोढा समिती आणि बीसीसीआय यांच्यातील संघर्षाने वाईट वळण घेतले असून सुमारे ९०० कोटींच्या जवळपास रक्कम राज्य संघटनांच्या खात्यात जमा करण्यास लोढा समितीने आक्षेप घेतल्यानंतर ‘खाती गोठवली’ असा कांगावा करून बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्ध मालिका अचानक रद्द करावी लागेल, अशी आवई उठवली आहे. पैशांअभावी आम्ही क्रिकेट चालवू शकत नाही, असे सांगत बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी लोढा समितीच्या कृतीवर भारतीय क्रिकेटरसिकांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, लोढा समितीने यावर लगेचच प्रत्युत्तर दिले. बीसीसीआयच्या कांगाव्यावर लोढा समितीचे प्रमुख निवृत्त न्यायमूर्ती लोढा यांनी, ‘बीसीसीआयची कोणतीही बँक खाती गोठवली नसून क्रिकेटच्या नैमित्तिक खर्चावरही बंधने लादण्यात आली नाहीत, असे तत्काळ स्पष्ट केले आहे.’

दरम्यान, न्यूझीलंड क्रिकेट असोसिएशननेही आपल्याशी बीसीसीआयने सामने अचानक रद्द करण्याविषयी कोणताही पत्रव्यवहार केला नाही किंवा संदेशही पाठवला नाही, असे स्पष्ट केले आहे. बुधवारी न्यूझीलंड क्रिकेट संघ ठरल्यानुसार तिसऱ्या कसोटीसाठी कोलकात्याहून इंदूरला रवाना होत असल्याचेही न्यूझीलंड क्रिकेट मंडळाकडून या वेळी सांगण्यात आले.

बँकांना फक्त सूचना दिल्या
निवृत्त न्यायमूर्ती लोढा यांनी आज स्पष्ट केले की, सोमवारी समितीने दोन बँकांना पाठवलेल्या पत्रात खाती गोठवण्यासंबंधी उल्लेखही करण्यात आलेला नाही. उलट बँकांना दोन विशेष निधी हस्तांतरण करण्याच्या आदेशाची, सर्वोच्च न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत कार्यवाही करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. स्टेडियमच्या डागडुजीसाठी प्रत्येक असोसिएशनला १० कोटी, तर चॅम्पियन्स टी-ट्वेंटी लीग रद्द झाल्याबद्दलची नुकसान भरपाई म्हणून मिळालेली रक्कम सर्व असोसिएशनमध्ये विभागून देण्यात येणार होती. ती रक्कम ६०० कोटींच्या घरात भरते. एवढी प्रचंड रक्कम (प्रत्येक असोसिएशनला सुमारे ३० कोटी) रातोरात हस्तांतरित होऊ नये, असे लोढा समितीला वाटते. ३१ ऑगस्ट रोजी लोढा समितीने बीसीसीआयला शिफारशी लागू करत नाही तोपर्यंत कोणताही नवा निर्णय घेऊ नये, नेहमीचे कामकाज करावे, असा आदेश दिला होता.

पैशाअभावी क्रिकेट बंद करावे लागेल
- अनुराग ठाकूर
- बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर तसेच सचिव अजय शिर्के यांनी न्यूझीलंड-भारत मालिकेच्या भवितव्याबाबत सांगण्यास नकार दिला. अनुराग ठाकूर यांनी बीसीसीआयची खाती गोठवण्यात आली नसतानाही पैशाशिवाय क्रिकेट हा खेळ चालू ठेवता येणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
- क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्याबाबतीत बीसीसीआयवर अवलंबून असणाऱ्या संलग्न राज्य संघटनांना आवश्यक तो निधी देणे गरजेचे आहे.
- भारतीय संघ कसोटीत पहिल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये दुसऱ्या व एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या स्थानावर असताना असोसिएशन्सना निधी मिळाला नाही, तर भारतीय क्रिकेटवर गंभीर परिणाम होतील.
- बीसीसीआयने आजतागायत कोणतीही अवैध गोष्ट केली नसताना बँकांना पैसे रोखून ठेवण्याचे आदेश का दिले गेले, या प्रश्नाचे उत्तर अपेक्षित आहे.
- बीसीसीआय राज्य किंवा केंद्र सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत घेत नाही. आम्ही स्वयंपूर्ण असून आमच्या तिजोरीतून आलेल्या पैशांवर राज्य संघटनांचे क्रिकेट चालते.

लोढा समितीचे प्रत्युत्तर
- आम्ही कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटवरच्या खर्चाला आडकाठी आणलेली नाही.
- कोणताही सामना अथवा मालिका रद्द करण्याचा प्रश्नच उद््भवत नाही. कारण त्यासाठीचा खर्च ही नैमित्तिक बाब आहे. तो खर्च गृहीत धरण्यात आलेला आहे. त्यामुळे क्रिकेट बंद होईल हा बीसीसीआयचा कांगावा आहे.
- बीसीसीआयचे कोणतेही बँक खाते गोठवण्यात आले नाही.
- सर्व नैमित्तिक प्रशासकीय खर्च, क्रिकेटवरचा खर्च व अत्यावश्यक खर्च करण्यावर कोणतेही बंधन आणण्यात आले नाही.
- मोठ्या निधीचे हस्तांतरण करणे हा नैमित्तिक खर्चही नाही किंवा अत्यावश्यक खर्चातही मोडत नाही, हे लक्षात घ्यावे.
- समितीने दिलेल्या सूचनांचा चुकीचा अर्थ लावणे गैर आहे.

बीसीसीआयचा ठेंगा
लोढा समितीच्या अनेक सूचना डावलून बीसीसीआयने कामकाज सुरूच ठेवले आहे. ३० सप्टेंबर २०१६ रोजी कार्यकारिणीत ९०० कोटींच्या जवळपास रक्कम सर्व संघटनांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर लोढा समितीने बँकांना ती रक्कम सर्व संघटनांच्या खात्यात जमा करू नये, असे ई मेलद्वारे कळवले होते. बीसीसीअायने लोढा समितीच्या अनेक सूचनांना ठेंगा दाखवत मनमानी कारभार केला.
बातम्या आणखी आहेत...