आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लंडन आय : भारत मार खातो फिटनेसमध्ये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तंदुरुस्ती किंवा फिटनेस किती महत्त्वाचा आहे? ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या देशांच्या सर्व अ‍ॅथलिट्सकडे पाहिले की याची प्रचिती येते. मात्र, भारताच्या काही स्पर्धकांकडे पाहिले की याच विधानातील विरोधाभास चटकन दिसून येतो. गगन नारंगची नेमबाजी अप्रतिम आहे. जगातील सर्वोत्तम शूटर्स त्याला वचकून असतात. तो मार खातो फक्त फिटनेसमध्ये. 50 मीटर्स रायफल शूटिंगचे पोझिशनचे भारताचे एक पदक याच फिटनेसच्या अभावामुळे गेले. सुवर्णपदक विजेत्यापेक्षा तो एका गुणाने प्रोन पोझिशनमध्ये मागे होता. निलिंगमध्येही तो पात्रतेच्या निकषांमध्ये होता.
पण स्टँडिंग पोझिशनने त्याचा घात केला. त्याची कंबर धरली होती. पाठीचा स्नायू दुखावला होता. शूटिंग करता करता तो ब-याच वेळा मागे खुर्चीत येऊन बसत होता. त्याने ‘शॉट’ खेळण्यासाठीही सर्वात अधिक वेळ घेतला. आवराआवर करून बाहेर पडणारा तो शेवटचा खेळाडू होता. मात्र, त्याच्या जिद्दीला मानायला हवे. त्याने त्या परिस्थितीतही लढत अर्धवट सोडली नाही. शेवटपर्यंत तो खेळत राहिला. त्याने आपले पूर्ण ‘शॉट’ खेळून क्रमवारीत येणे पसंत केले. त्याचा 20वा क्रमांक खरे चित्र दाखवत नाही. पदकाची एक संधी हुकली ते त्यातून कधीही स्पष्ट होणार नाही.
भारताची दुसरी शूटर राही सरनोबत हिच्याबाबतीतही हेच बोलावे लागले. अन्य देशांचे स्पर्धक जबरदस्त फिटनेसमुळे सहज पुढे जात होते. गुणवत्ता असलेल्या राहीने अप्रतिम कामगिरी केली; परंतु तंदुरुस्ती असती तर भारताला कदाचित तिच्याकडूनही पदक मिळाले असते. रौप्यपदक विजेता विजयकुमार फिटनेसमुळे त्याच्या कामगिरीत आजवर सातत्य राखून आहे. गुणवत्ता आणि तंदुरुस्ती यांचा मिलाफ झाला तरच आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळू शकतात. किमान ऑलिम्पिकसारख्या चार वर्षांनी होणा-या स्पर्धेसाठी प्रत्येक जण आपला फिटनेस राखून येतो. भारतीयांच्या बाबतीत मात्र असे दिसून आले नाही.
भारताचे नेमबाज एरवी वर्ल्ड चॅम्पियनशिपसारख्या मोठ्या स्पर्धेत चांगली कामगिरी करतात, अव्वल क्रमांकही राखून होते. लंडनमध्ये आल्याबरोबरच आजारी पडले आणि सगळ्यांसमोर हसू करून घेतले. आज केंद्र सरकारदेखील या खेळाडूंना सर्व सुविधा, प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफ देत आहे. असे असतानाही, खेळाडूंच्या फिटनेसची काळजी कुणी घ्यायची? खेळाडूंना फिट ठेवण्यात अपयशी ठरलेल्या संबंधितांना कुणी जाब विचारायचा? दोन संघटना करून भारताची आधीच दुबळी झालेली हॉकी आणखी दुभंगली. एकेकाळी ऑलिम्पिकवर साम्राज्य असणा-या भारताची हॉकी पाहायला आजही अन्य देशांचे प्रेक्षक येतात. या वेळी त्यांना आपसातील भांडणांमुळे क्षीण झालेली भारतीय हॉकी पाहायला मिळाली. टेनिसमध्येही तेच पाहिले. स्पर्धेला जाण्याआधीपासूनच सर्वांची तोंडे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला होती. राष्ट्रकुल घोटाळ्यांचे थडगे खणत बसलेल्या क्रीडामंत्र्यांना, अजय माकन यांना या संघटनांना, भांडणा-या खेळाडूंना खडसावता येत नाही? क्रिकेटच्या मागे हात धुऊन लागलेल्या माकन महाशयांनी अन्य खेळांतील दुर्दशा दूर करण्यासाठी कंबर कसणे आवश्यक आहे. देशाच्या करदात्यांचा पैसा खर्च करणा-या खेळाडू, पदाधिकारी, अन्य सपोर्ट स्टाफ यांना त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्याबद्दल धारेवर धरण्याची गरज आहे.