आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिम्पिकमध्ये पदकाचे एकमेव लक्ष्य : संदीप

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आतापर्यंत हॉकी कारकिर्दीत 134 आंतरराष्टÑीय गोल केल्यानंतरही दिवसेंदिवस गोल करण्याची भूक वाढतेय, अशी प्रतिक्रिया भारताचा स्टार हॉकीपटू संदीप सिंगने ‘भास्कर’ समूहाशी बोलताना व्यक्त केली. हातावर पाच खंडांचे प्रतीक असलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे टॅटू तसेच मनात भारतीय हॉकीला जुने वैभव प्राप्त करून देण्याचे स्वप्न उराशी बाळगून खेळत आहे. येत्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला हॉकीत पदक जिंकून देण्याचे एकमेव लक्ष्य असल्याचेही या वेळी संदीपने नमूद केले.
फ्रान्सविरुद्ध ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात पाच गोल करून संदीप सिंग एका रात्रीत तमाम युवकांचा ‘हीरो’ झाला. सोमवारी त्याने वयाची 27 वर्षे पूर्ण करताना वाढदिवस साजरा केला. ‘भास्कर’ समूहाशी बोलताना त्याने मनमोकळ्या गप्पा मारल्या. चिमणीच्या डोळ्याप्रमाणे आता पूर्ण संघाचे लक्ष केवळ ऑलिम्पिक पदकावर आहे, असेही त्याने म्हटले. लंडन ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करून हॉकीला गतवैभव प्राप्त करून देण्याची चांगली संधी आहे. असे झाले तर ऑलिम्पिकचे यश मैलाचा दगड ठरू शकेल. यामुळे पूर्ण हॉकी संघ जबरदस्त उत्साहात आहे. सर्व काही योग्य दिशेने काम होत आहे. ऑलिम्पिकसाठी खूप कमी वेळ उरला आहे. आता केवळ ऑलिम्पिकची कसून तयारी करणे गरजेचे आहे. ऑलिम्पिकमध्ये मोठे यश मिळवायचे असेल तर त्यापूर्वी मजबूत संघासोबत अधिकाधिक सराव होणे गरजेचे आहे, असेही संदीप म्हणाला.
ऑस्ट्रेलिया, हॉलंड, जर्मनी आणि स्पेनसारख्या तगड्या संघाविरुद्ध अधिक सराव झाला तर याचा लाभ ऑलिम्पिकमध्ये मिळू शकतो. भारतास आता जगातल्या सर्वश्रेष्ठ चार हॉकी संघात स्थान मिळवून देण्याचेही आपले लक्ष्य असल्याचे संदीप सिंगने सांगितले.
संघाचा उपकर्णधार आणि ऑलिम्पिक पात्रता फेरीत सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून निवडण्यात आलेला सरदार सिंगही संदीपच्या मताशी सहमत दिसला.

प्रशिक्षक नोब्स यांनी संघात चैतन्य आणले : सरदार सिंग
ऑलिम्पिकसाठी संघाचा आत्मविश्वास बुलंदीवर आहे. भारतीय संघाच्या खेळात कुठेच कमी नाही. मिळालेल्या संधीला गोलमध्ये बदलण्याची गरज आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये आता भारतीय हॉकी आपला आक्रमक खेळ आणि शैलीचे प्रदर्शन करील. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक मायकेल नोब्स आणि फिजियो डेव्हिड जोंस यांनी संघात नवे प्राण ओतले आहे. त्यांच्यामुळे संघात नवे चैतन्य आले आहे, असे या वेळी सरदार सिंगने सांगितले. आता संघात रणनीतीची कमी नाही आणि खेळाडूंच्या फिटनेसचीही अडचण नाही. लंडनमध्ये सुद्धा भारतीय हॉकीचे विजयी अभियान सुरूच राहील, असा विश्वास त्याने व्यक्त केला.