हैं तैयार हम! / हैं तैयार हम!

विनायक दळवी

Aug 07,2011 03:26:26 AM IST

चीनच्या तोडीचे ऑलिम्पिक आम्ही भरवू शकणार नाही. चीनप्रमाणे अफाट आणि अचाट अशी स्पर्धा आम्ही आखू शकणार नाही... हे उद्गार होते लंडनच्या महापौरांचे, जेव्हा त्यांनी तीन वर्षांपूर्वी बीजिंगमध्ये लंडन ऑलिम्पिकच्या यजमानपदाचा ध्वज स्वीकारला होता. पण आज स्पर्धांना प्रत्यक्ष सुरुवात होण्यास एका वर्षाचा अवधी असतानाचे लंडन शहर, ऑलिम्पिक स्टेडियम्स आणि अन्य सुविधांची त्यांची सज्जता पाहिली तर लंडनच्या महापौरांचे ते विधान पटत नाही. कारण आज लंडन शहर एका महिन्याने आॅलिम्पिक स्पर्धा घ्यायच्या म्हटल्या तरी घेऊ शकण्याच्या क्षमतेइतके सज्ज आहे.

उत्पन्नाचे या आधीच्या आॅलिम्पिक स्पर्धांचे सगळे आकडे लंडन ऑलिम्पिकमध्ये मोडीत निघणार आहेत. खेळाडूंसाठीच्या सोयीसुविधा याबाबतीत लंडन आपला नवा आदर्श इतरांपुढे ठेवणार आहे.जगातील सर्वात गजबजलेल्या शहरांपैकी एक लंडन. उन्हाळ्यात येथे कोट्यवधी पर्यटक येतात. ऑलिम्पिक स्पर्धांच्या वेळी येणाºया पाहुण्यांचे आणि पर्यटकांचे ते प्रमाण दहापट वाढलेले असेल, असा निष्कर्ष आधीच काढण्यात आला आहे. ऑलिम्पिक स्पर्धांदरम्यान कुणाला सुट्या घेऊन लंडन शहरातील गर्दी कमी करता येईल याचीही योजना आखण्यात येत आहे. सरकारी कर्मचाºयांना घरूनच काम करण्याचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात झाली आहे. गरज नसेल, तिकीट नसेल तर स्पर्धा पाहण्यासाठी बाहेर पडू नये, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. फक्त लंडन शहरातील गर्दीचा विचार करण्यात येत नाही, लंडनला लागून असणाºया शहरांचा तसेच ऑलिम्पिकपूर्व तयारीसाठी येणाºया खेळाडूंसाठी व्यवस्था करण्यात आलेल्या अन्य पाच शहरांचाही विचार आतापासून करण्यात येत आहे.
स्पर्धांचे आयोजन केल्यानंतर त्या सुविधांचे करायचे काय हा विचारदेखील आतापासूनच करण्यात आला आहे. लंडन आॅलिम्पिक हे याआधीच्या आॅलिम्पिकच्या दृष्टीने म्हणूनच आगळेवेगळे ठरणार आहे. पोलादाचा तुटवडा लक्षात घेऊन लंडन ऑलिम्पिक पार्क परिसरातील सर्व स्टेडियम्स तसेच अन्य स्टेडियम्स ७५ टक्के कमी पोलादाचा वापर करून तयार करण्यात आली आहेत. ऑलिम्पिक पार्कमधील मुख्य स्टेडियमची आसनक्षमता आहे ८० हजारांची.

आॅलिम्पिक पार्क परिसरात अनेक स्टेडियम्स आहेत. ती उभारताना सध्या अस्तित्वात असलेली ट्यूब रेल्वे, डॉकयार्ड, रेल्वे शाबूत ठेवून ३० इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. मात्र त्यापैकी एक वीट, दगड, रेती, चुना, माती फुकट जाऊ दिले नाही. त्या सर्व गोष्टींवर पुन्हा प्रक्रिया करून स्टेडियमच्या उभारणीसाठी वापरण्यात आल्या. फक्त १० हजार टन पोलाद हे पार्क उभारताना वापरण्यात आले. त्यामध्ये मुख्य स्टेडियम, सायकल व्हेलोड्रोम आणि जलतरण स्टेडियम यांचा व अन्य सुविधांचा समावेश आहे.

लंडन ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करणारी समिती ही खासगी क्षेत्रातील कंपनी स्थापन करण्यात आली असून, ऑलिम्पिकच्या आयोजनाची जबाबदारी या कंपनीची आहे, सरकारची नाही. त्यासाठी त्यांनी २ अब्ज पौंड खर्चाचे अंदाजपत्रक आखले आहे. या कंपनीला अर्थसाहाय्य ब्रिटनचे सांस्कृतिक खाते, ग्रेटर लंडन ऑथरिटी, लंडन डेव्हलपमेंट एजन्सी आणि आॅलिम्पिक लॉटरी डिस्ट्रिब्युटर हे करणार आहेत. त्याशिवाय तिकीटविक्रीमार्फत येणारा पैसा, टेलिव्हिजन प्रसारण हक्क आणि आॅलिम्पिक समितीकडून येणारा पैसा हा लंडन ऑलिम्पिक आयोजन समितीकडे येणाºया पैशाचा मुख्य स्रोत असेल. त्याशिवाय येत्या वर्षभरात ऑलिम्पिक्सच्या निमित्ताने होणाºया उत्पादनांमार्फतही मिळणारी हमीची रक्कम प्रचंड असेल. तिकिटविक्रीदेखील वेगवेगळ्या टप्प्यात सुरू करण्यात आली आहे. त्यापैकी ३०० कोटी पौंडांची तिकिटे विकली गेली असून उर्वरित दहा लाख तिकिटांसाठी १ कोटीहून अधिक अर्ज आले आहेत. मुख्य ऑलिम्पिक स्टेडियम, हॅन्डबॉल स्टेडियम, सायकल व्हेलोडोम, अ‍ॅक्वेटिक सेंटर, ली व्हॅली व्हाइट वॉटर सेंटर, इंटरनॅशनल ब्रॉडकास्टिंग सेंटर आणि मेन प्रेस सेंटरचे बांधकाम पूर्ण झाले आहे. वर्षाआधीच लंडन एवढे सज्ज आहे. वर्षभरात नव्या नवलाईच्या ऑलिम्पिकच्या नावीन्यपूर्ण गोष्टी आपण पाहणार आहोत.

भारतात झालेल्या, ब्रिटिशांचेच अपत्य असलेल्या, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आधी आणि नंतर घडलेल्या घटना आणि ब्रिटनचे आॅलिम्पिक अयोजन, यातील विरोधाभास चटकन नजरेत भरतो. भारतात स्पर्धा सुरू होईपर्यंत कामे झालेली नव्हती, तर ब्रिटिश नागरिक एक वर्ष असतानाच महत्त्वाच्या सेवा व सोयी सज्ज करून बसले आहेत. स्पर्धा आटोपल्यानंतर स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष खासदार सुरेश कलमाडी यांच्यापासून सचिव ललित भानोत, व्ही. के. वर्मा आदी अधिकारी, पदाधिकारी भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सध्या जेलची हवा खात आहेत. लंडन आॅलिम्पिक्स्चे आयोजन तेथील सरकारने आयोजन समितीचीच खाजगी संस्था बनवून त्यांना दिले आहे. ज्यांचा कारभार सरकारबाहेरचे आणि व्यावसायिक लोक पाहातात. कारभारातला पारदर्शीपणा उठून दिसतो. त्यामुळेच काही गोष्टी आपल्याप्रमाणे झाकून ठेवल्या जात नाहीत; ज्या गोष्टी बाहेर आल्या की भ्रष्टाचाराचा वणवा पेटतो.

X
COMMENT