आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन ऑलिम्पिक : भारतीय पथक आजवर सर्वांत मोठे; 13 क्रीडाप्रकारांत 81 खेळाडू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 27 जुलैपासून सुरू होणा-या लंडन ऑलिम्पिकमध्ये एकूण 13 क्रीडाप्रकारांत एकूण 81 भारतीय खेळाडू सहभागी होणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. बीजिंगच्या गत ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने 12 क्रीडा प्रकारात एकूण 57 क्रीडापटू उतरवले होते. त्यामध्ये भारताला एक सुवर्ण व 2 कांस्य पदके मिळाली होती.
सोमवारी लंडन ऑलिम्पिकसाठी खेळाडूंची नावे पाठवण्याची अंतिम तारीख होती. भारताने सोमवारी एकूण 81 खेळाडूंची नावे पाठवली. त्यामध्ये 13 पैकी केवळ हॉकी या एकमेव सांघिक क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व असेल. भारतीय हॉकी संघ हा एकमेव संघ सांघिक क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहे. हॉकी स्पर्धेत सहभागी होणा-या संघात 16 खेळाडूंचा समावेश असेल. त्या पाठोपाठ सर्वाधिक खेळाडू (14) अ‍ॅथलेटिक्स या क्रीडाप्रकारांत सहभागी होणार आहेत. नेमबाजी (शूटिंग) स्पर्धेत 11 तर बॉक्सिंगमध्ये 8 खेळाडू सहभागी होतील.
भारतीय पथकाचे उप पथकप्रमुख मुरलीधर राजा यांनी या वेळी भारतीय पथकामध्ये विश्व दर्जाच्या खेळाडूंसोबत दोन हात करून पात्र ठरलेले खेळाडू अधिक असल्याने पदकांच्या आशा वाढल्या आहेत, असे सांगितले. ते म्हणाले, भारताला नेमबाजी, तिरंदाजी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, टेनिस व कुस्ती स्पर्धेत पदकांच्या आशा आहेत.
गत ऑलिम्पिकचा नेमबाजीतील सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा, नेमबाज रंजन सोधी, दिपिका कुमारी, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, मुष्ठीयोद्धा विजेंदर सिंग आदी नावाजलेले खेळाडू भारताच्या पथकात आहेत. बीजिंग ऑलिम्पिकनंतर उदयास आलेले जागतिक दर्जाचे खेळाडू भारतीय पथकात आहेत. त्यामुळे या खेळाडूंकडून भारताला पदकांची आशा या वेळी करता येईल, असे मुरलीधर राजा यांनी सांगितले. राजा म्हणाले, पदकांबद्दल जरी ठामपणे सांगता येत नसले तरीही भारतीय खेळाडूंची आपापल्या खेळातील सध्याची विश्व दर्जाची कामगिरी, त्या क्षणी त्यांना दैवाची व हवामानाची साथ लाभली तर निश्चितच पदके मिळवून देऊ शकेल.
लंडन येथील हवामानाशी मिळतेजुळते व्हावे यासाठी अ‍ॅथलिट आणि रोर्इंग या स्पर्धेचे स्पर्धक 15 जुलै रोजी लंडनला पोहोचतील. प्रत्यक्ष क्रीडा प्रकाराआधी ते 12 दिवस आधी पोहोचणार आहेत. भारतीय पथकातील काही अधिकारीही 14 जुलै रोजी लंडनला दाखल होणार आहेत. भारतीय खेळाडूंच्या स्पर्धेच्या पूर्वतयारीची व्यवस्था करण्याकरता हे अधिकारी पोहोचणार आहेत.