आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लंडन आय : प्रवृत्तींमधला फरक!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑलिम्पिक ही एक अशी चळवळ आहे की ज्या कल्पनेने जगाला आज खेळाच्या आणि सांस्कृतिकतेच्या मंचावर एकत्र बांधून ठेवले आहे. स्पर्धेत सहभागी देशांपैकी शंभरावर देशांना आजवर एकही पदक मिळाले नाही. तरीही या देशांचे खेळाडू प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये हिरिरीने भाग घेत आहेत. ऑलिम्पिकला येताना हृदयात देशाचा अभिमान असतो. पदक जिंकण्याची इच्छा असते. चीन, अमेरिका असो वा पदके मिळवण्याची क्षमता नसणारे देश. प्रत्येक देशाच्या स्पर्धकाचे पहिले ध्येय देशासाठी पदक पटकावण्याचे. या तत्त्वाला भारताच्या रामसिंग यादवने छेद दिला. ज्या देशाचे खातो, ज्या लष्कराकडून त्याला सवलती मिळतात, त्याचा तो उघडपणे इन्कार करत आहे. लष्कराच्या जवानाने असे विधान करावे हे आक्षेपार्ह आहे. सर्वात मोठे भारतीय पथक लंडनमध्ये आले आहे. नेमबाज, मुष्ठियोद्धे, बॅडमिंटनपटू यांचे अपवाद वगळता अन्य खेळांमधील खेळाडूंची देहबोली उत्साहवर्धक नव्हती. टेनिसपटूंनी आपली भांडणे भारतातच जाहीर केली होती. अ‍ॅथलेटिक्स, ज्युडो, टेबल टेनिस, जलतरण, वेटलिफ्टिंग आणि हॉकी या खेळातील खेळाडूंचा सहभाग केवळ नाममात्र होता. अनेकांनी आपापली सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीही लंडनमध्ये गाठली नाही.
ऑलिम्पिक स्पर्धेसाठी बालपण आणि आयुष्य पणास लावणारे सायना नेहवालसारखे खेळाडू ज्या देशात आहेत, त्याच देशात असेही खेळाडू आहेत, ज्यांना केवळ सहभाग हेच ऑलिम्पिकचे ध्येय मानले आहे. जगातील सर्वोत्तम आणि सर्वोच्च क्रीडा व्यासपीठावर अनेक भारतीय खेळाडूंचे पितळ उघडे पडते. देशाप्रती असलेले प्रेम, खेळाच्या बाबतीत असलेली निष्ठा किती बेगडी आहे याची जाणीव होते. ज्या देशात भारताचा तिरंगा फडकताना अभिमानाने पाहणारा, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा लिएंडर पेससारखा टेनिसपटू आहे, त्याच देशात रामसिंग यादवसारखे स्वार्थी खेळाडूही आहेत. रामसिंग यादवने मनातील भावना व्यक्त केली, असे अनेक रामसिंग आपल्या पथकात आहेत, ज्यांना ऑलिम्पिक सहभागाचे आणि विजयी होण्याचे महत्त्वच कळलेले नाही. प्रत्येक देशाच्या खेळाडूंमध्ये अंतर्गत भांडणे असतात, संघटनेत कलह असतो, परंतु ऑलिम्पिकमध्ये आल्यानंतर त्या गोष्टी नगण्य ठरतात. देश मोठा असतो. देशासाठी पदक मोठे असते. जिंकणे ही स्वत:ची नाही, तर देशाची प्रतिष्ठा ठरते. अमेरिका किंवा युरोप खंडातील प्रगत देशाचे असेही विजेते, ऑलिम्पियन खेळाडू आहेत, ज्यांना स्वत:च्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाच्या समस्या आहेत. काहींपुढे वैवाहिक जीवनातील समस्या आहेत. विभक्त होण्याच्या समस्यांनी कित्येकांना ग्रासले आहे. फेल्फ, बोल्ट यांच्यासारख्यांनाच प्रचंड जाहिराती मिळतात, गडगंज संपत्ती करता येते. असे किती तरी ऑलिम्पियन पदक विजेते आहेत, ज्यांना स्वगृही गेल्यानंतर जगण्यासाठी धडपड करावी लागते. स्वत:चे क्रीडाकौशल्य विकावे लागते, पण कुणीही स्वत:च्या देशाचा अभिमान विकला नाही.
लंडनमधील अपयशी भारतीय खेळाडूंच्या चेह-याकडे पाहिले की वाटते, यांना रिक्त हस्ते परत जाण्याचे काहीच शल्य वाटत नाही. कांस्यपदक पटकावल्यानंतरही ‘मला आता घरी जाऊन तत्काळ पुढच्या ऑलिम्पिकच्या तयारीला लागायचे आहे.’ असे म्हणणारी सायना नेहवाल ज्या देशाचे प्रतिनिधित्व करते त्याच देशाचे प्रतिनिधित्व रामसिंग यादवसारखे खेळाडू करतात. या दोन भिन्न प्रवृत्तीच विजय आणि पराजय यातील फरक घडवत असतात.