आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटच्या देवाला टेकडी गणेशाचा आशीर्वाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन रमेश तेंडुलकर आज क्रिकेटचा देव झालाय. लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, सुनील गावसकर यांसारख्या जिवंतपणीच दंतकथा झालेल्यांच्या रांगेत तो केव्हाच जाऊन बसलाय. त्याने शतकांचे डोंगर रचलेयत. यश, पैसा, प्रसिद्धी सारे त्याचे गुलाम आहेत. सुख त्याच्या दाराशी त्याच्याइतकेच नम्रतेने हात जोडून उभे असते.
टेकडी गणेश मंदिराचे उपाध्यक्ष पुंडलिकराव जौंजाळ यांना सचिनबद्दल किती बोलू आणि किती नको असे होऊन गेले होते. क्रिकेटचा देव असलेला सचिन नागपूर येथील टेकडी गणेशाचा निस्सीम भक्त आहे. अस्सल वारक-याची पंढरपूरची वारी चुकत नाही तसे नागपुरात आल्यावर सचिनचे कधी टेकडी गणेशाचे दर्शन चुकले नाही. 1985 पासून सचिन येथे नियमित येतोय. त्यालाही आता 28 वर्षे होत आलीयत. त्याच्या आगमनाची बातमी आम्ही कितीही लपवली; त्याबाबत कमालीची गुप्तता बाळगली तरी का कोण जाणे, मीडियाला कुठून तरी कुणकुण लागायची. मग दुस-या दिवशी बातमी आली की देवळात अंगारकी वा संकष्टी चतुर्थी नसतानाही तोबा गर्दी उसळायची. ही गर्दी अर्थातच क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला पाहण्यासाठी असायची...
सचिन बहुतांश वेळा दुपारी साडेबारा ते दीडच्या सुमारास आला. त्याची कार थेट देवळाच्या दारात यायची. उतरल्यावर तो थेट गाभा-यात जाऊन दर्शन घेत असे. आपण एक स्टार खेळाडू आहोत, त्यामुळे आपल्याला व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट मिळावी असा दुराग्रह त्याने कधीही धरला नाही. सामान्य भक्तासारखा तो नेहमी यायचा, दर्शन घ्यायचा आणि शांतपणे निघून जायचा. चार-दोन सामने खेळलेले आणि चार-दोन चित्रपट केलेले क्रिकेटपटू आणि सिनेस्टार गाजावाजा करून येतात. आपण खूप कुणी तरी मोठे असल्याचा आव आणतात; पण सचिनने कधीही असा बडेजाव केला नाही. मोठेपणाची झूल बाजूला ठेवून तो नेहमी सामान्यासारखा येतो, असे जौंजाळ यांनी सांगितले. त्यांनी सर्वाधिक चार ते पाच वेळा सचिनचे स्वागत केले आहे. गेली 28 वर्षे सचिन टेकडी गणेश मंदिरात येतोय; पण त्याचे रेकॉर्ड मंदिराने ठेवलेले नाही. त्याच्यासोबत कुणाचा एखादा फोटोही नाही. अपवाद 19 फेब्रुवारी 2002 चा. त्या वेळी व्हिजिटर्स बुकमध्ये सचिनने अभिप्राय नोंदवून स्वाक्षरी केलीय. याबाबत जौंजाळ यांना विचारले असता सचिनजवळ इतका वेळच राहत नसे, असे त्यांनी सांगितले.
12 मार्च 2011 रोजी जामठा येथील व्हीसीएच्या स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा वर्ल्ड कपचा सामना होता. त्या वेळी सचिन येणार हे माहीत असल्याने चाहत्यांची तोबा गर्दी उसळली. येथे आता निवांत दर्शन होणार नाही हे सचिनच्या लक्षात आले. तो उड्डाणपुलावरून हात जोडून तसाच माघारी फिरला. त्या सामन्यात सचिनने शतक मारले. तेव्हापासून सचिन नागपुरातच आलेला नाही. क्रिकेटच्या या देवाचे एकदा पुन्हा दर्शन व्हावे हीच टेकडी गणेशाला प्रार्थना आहे...