Home | Sports | From The Field | lords test series cricket

लॉर्डस कसोटी : विक्रमांचा पडणार पाऊस!

वृत्तसंस्था | Update - Jul 19, 2011, 06:08 AM IST

येत्या २१ जुलैपासून सुरू होत असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या दोन दिग्गज खेळाडूंना आणखी नव्या विक्रमांना गवसणी घालण्याची संधी आहे.

 • lords test series cricket

  लंडन. येत्या २१ जुलैपासून सुरू होत असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या दोन दिग्गज खेळाडूंना आणखी नव्या विक्रमांना गवसणी घालण्याची संधी आहे.
  या कसोटी सामन्यात एक शतक ठोकून आंतरराष्ट्रीय स्तरावर १०० शतके पूर्ण करण्याची संधी सचिनला असेल. शिवाय आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा टप्पा गाठण्याचीही संधी या वेळी त्याच्याकडे असेल. वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ४८ शतके आहेत. या मालिकेत ३०८ धावा काढताच सचिन कसोटीत १५००० धावांचे शिखर गाठणारा जगातला पहिला फलंदाज ठरेल.
  दुसरीकडे भारतीय संघाचा मधल्या फळीचा फलंदाज राहुल द्रविडकडे कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील दुस-या क्रमांकाचा सर्वाधिक यशस्वी फलंदाज बनण्याची संधी आहे. तो पॉंटिंगला मागे टाकून विक्रम करेल.
  सचिन बनणार पंधरा हजारी !
  भारत आणि इंग्लंडदरम्यान खेळल्या जाणाºया मालिकेतील पहिला सामना क्रिकेटच्या इतिहासातील २००० वा, तर या दोन्ही देशांतील शंभरावा सामना ठरणार आहे. दुसरीकडे सचिन तेंडुलकरला शतकांचे शतक पूर्ण करण्यासाठी आणखी एका शतकाची गरज आहे. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया लॉर्ड्सच्या मैदानावर त्याला ही संधी आहे. भारताच्या मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आतापर्यंत १७७ कसोटीत ५१ शतकांच्या मदतीने एकूण १४६९२ धावा काढल्या आहेत.
  राहुल द्रविड पाँटिंगला मागे टाकणार !
  दुसरीकडे ५० धावा काढताच राहुल द्रविडसुद्धा ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगला मागे टाकून कसोटी क्रिकेटमधील दुस-या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज बनेल. द्रविडने आतापर्यंत १५३ कसोटीत एकूण १२३१४ धावा काढल्या आहेत. पाँटिंगच्या नावे कसोटीत १५२ सामन्यांत १२३६३ धावा आहेत. द्रविड भारताकडून सचिननंतर १० धावा काढणारा तिसरा फलंदाज ठरला होता.
  किरमाणींना मागे टाकण्याची धोनीला संधी
  धोनीला भारताचा सर्वाधिक यशस्वी यष्टिरक्षक बनण्यासाठी या कसोटी मालिकेत १४ बळींची मदत घ्यावी लागेल. भारताचा कर्णधार धोनीने आतापर्यंत ५७ कसोटीत १६० झेल आणि २५ यष्टिचीतसह एकूण १८५ बळी घेतले आहेत. धोनीकडे भारताचे सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक सय्यद किरमाणींना मागे टाकण्याची संधी आहे. किरमाणी यांनी ८८ कसोटीत १६० झेल घेतले तर ३८ खेळाडू यष्टिचीत केले आहेत.
  सेहवाग बनणार आठ हजारी
  धोनीच्या मते, सेहवाग शस्त्रक्रिया झाल्यानंतर अजून पूर्ण फिट न झाल्यामुळे तो बहुदा पहिल्या दोन कसोटीत खेळू शकणार नाही. मात्र, उर्वरित दोन कसोटीत तो मैदानावर उतरला आणि या काळात त्याने ३८९ धावा काढल्या तर तो कसोटी क्रिकेटमध्ये ८ हजार धावांचा टप्पा ओलांडेल. अशी कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरेल. त्याने आतापर्यंत ८६ कसोटीत ५३.५९ च्या सरासरीने ७६११ धावा काढल्या आहेत. यात २२ शतके आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे.

Trending