पुणे - जहीर अतिशय गुणवान खेळाडू आहे. फक्त त्याची खरी गुणवत्ता प्रकट होण्यासाठी त्याला जरा डिवचावे लागते. तो रागावला की अत्युत्तम कामगिरी करतो, असे मिष्किल आवाजात सांगत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शनिवारी पत्रकारांचीच फिरकी घेतली.
भारतीय टीममधला वेगवान गोलंदाज जहीर खान याच्या नव्या टॉस स्पोर्टस लाउंजचे उद्घाटन सचिनच्या हस्ते झाले. त्यानंतर सचिन बोलत होता. जहीरची नवी इनिंग कोरेगाव पार्क भागातील झेडकेज या पहिल्या रेस्टॉरंटने सुरू झाली होती. तेव्हाही उद्घाटनाला सचिनच आला होता. त्यात जहीरने आता दोन रेस्टॉरंट्स आणि दोन टॉस लाउंज अशी प्रगती केली आहे. क्रिकेटप्रमाणेच जहीरची ही नवी इनिंगसुद्धा बहरते आहे, अशा शब्दांत सचिनने जहीरचे कौतुक केले.
पुण्यात मी खूप खेळलो नाही. एक सामना मात्र आठवतो. मी बारा वर्षांचा असताना पीवायसी मैदानावर आलो आणि रनआऊट झालो म्हणून खूप रडलो होतो. तेव्हा वासू परांजपे आणि मिलिंद रेगे यांनी माझी समजूत काढली होती. मी तेव्हा १५ वर्षांखालील स्पर्धा खेळत होतो, अशी आठवण सचिनने सांगितली.
जहीर सरस
जहीर सरस गोलंदाज आहे. त्याने अपेक्षा नेहमी पूर्ण केल्या. फक्त त्याचा सर्वोत्तम स्पेल पाहायचा असेल, तर त्याला डिवचावे लागते. कर्णधार म्हणून मला हे उमगले तेव्हा मी प्रयत्नपूर्वक ते केले. ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅग्रा, पािकस्तान संघाचा वकार युनूस हे भेदक गोलंदाज होते, तसाच जहीर मला भेदक वाटतो, असेही यावेळी सचिन म्हणाला.
...अन् दादा खुश
पाकिस्तानविरुद्ध सियालकोटच्या मैदानावर वकारला लागोपाठ तीन छक्के लगावूनच मी त्याचे टेन्शन दूर केले होते, तेव्हा दादा (सौरभ) खुश झाला होता. तसाच प्रसाद मी ऑस्ट्रेलियात खेळताना मॅग्राला दिला होता. कुठलेही दडपण झुगारण्याचा तो उत्तम उपाय आहे. त्यामुळे हमखास यशस्वी ठरणा-या गोलंदाजाचीही लय बिघडवता येते, असे सचिनने सांगितले.