माद्रिद - गतवेळच्या विजेत्या बार्सिलोनाला ला लीग चषक स्वत:कडे राखणे अवघड ठरणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेटाफेविरुद्धचा सामना 2 -2 ने बरोबरीत सुटल्याने त्यांच्यावर ही आफत ओढवली आहे.
बार्सिलोनाने अॅटलेटिको माद्रिदपेक्षा एक सामना जास्त खेळूनदेखील गुणतालिकेत ते तीन गुणांनी मागे आहेत. तसेच बार्सिलोनाचे आता केवळ दोनच सामने उरले असल्याने इतकी पिछाडी भरून काढणे त्यांना अवघडच जाणार आहे.
मेसीने केली सुरुवात
बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लियोनेल मेसीने सामन्याच्या पूर्वार्धात पहिला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र, गेटाफेच्या लफिताने मध्यंतरापूर्वी गोल करत सामना बरोबरीत आणून ठेवला. त्यानंतर उत्तरार्धात पुन्हा अॅलेक्सिस सॅँचेजच्या गोलमुळे बार्सिलोनाने आघाडी घेतली. मात्र, इंज्युरी टाइममध्ये पुन्हा एकदा लफिताने केलेल्या गोलमुळे बार्सिलोनाला बरोबरीतच समाधान मानावे लागले.
आता केवळ सन्मानासाठी खेळणार
सामन्यात ज्या चुका केल्या त्यांचा फटका आम्हाला सहन करावा लागला. या सामन्यामुळे चषक राखण्याच्या आशा संपुष्टात आल्याने आता उर्वरित दोन सामने आम्ही सन्मानाखातर खेळणार आहोत. निदान पुढील ला लिगा तरी आमच्यासाठी फलदायी ठरेल, अशी अपेक्षा असल्याचे बार्सिलोनाच्या सर्जिओ बास्केट्स याने सांगितले.
छायाचित्र - किक मारण्याच्या प्रयत्नात बार्सिलोना आणि गेटाफेचे खेळाडू.