सोची - पाच वेळचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वानाथन आनंदला रविवारी जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. गतविजेत्या मॅग्नस कार्लसनने स्पर्धेच्या दुस-या फेरीत भारताच्या आनंदवर मात केली. त्याने ३४ व्या चालीवर विजय मिळवला. यासह त्याने स्पर्धेत १.५ गुणांनी आघाडी मिळवली. स्पर्धेतील सलामीची लढत बरोबरीत राहिली होती. त्यामुळे दाेन्ही खेळाडूंनी प्रत्येकी ०.५ गुणांची कमाई केली. आता स्पर्धेतील एकूण दहा फे-या शिल्लक आहेत.
आता तिस-या लढतीत बाजी मारून स्पर्धेत दमदार पुनरागमन करण्याचा भारताच्या आनंदचा प्रयत्न असेल. आनंदच्या नावे ०.५ गुण आहेत. दुस-या फेरीत आनंदला समाधानकारक खेळी करता आली नाही त्यामुळे त्याला पराभवाला सामोरे जावे लागले. याचा फायदा घेत नॉर्वेच्या कार्लसनने शानदार विजय मिळवला. यासह त्याने लढतीत आघाडी घेतली. नॉर्वेच्या खेळाडूने पहिल्या सामन्यात गुनफेल्ड डिफेन्सच्या खेळीने पाच वेळच्या चॅम्पियन आनंदला चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे आनंदविरुद्धची ही लढत त्याला बरोबरीत ठेवता आली. या वेळी शेवटच्या टप्प्यात आनंदला विजयाची संधी होती. मात्र, कार्लसनच्या खेळीने भारताच्या खेळाडूचा विजयाचा प्रयत्न अपयशी ठरला.