आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahadev Kusmude, Utkarsh Kale Got Gold In Maharashtra Keshri

महाराष्‍ट्र केसरीत चंद्र‘हार’,महादेव कुसुमडे, उत्कर्ष काळेला सुवर्णपदक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे (पिंपरी) - हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत रंगत असलेल्या महाराष्‍ट्र केसरी स्पर्धेत काल मोठे उलटफेर बघायला मिळाले. या स्पर्धेच्या विजेतेपदाचा मुख्य दावेदार असलेला सांगलीचा मल्ल चंद्रहार पाटीलचे तिस-यांदा महाराष्‍ट्र केसरी होण्याचे स्वप्न भंगले आणि पहिल्याच फेरीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला. पुण्याचा मल्ल सचिन येलभरने त्याला अस्मान दाखवत त्याचे आव्हान संपुष्टात आणले. मात्र, महादेव कुसुमडे, उत्कर्ष काळे आणि शरद पवार यांनी सुवर्णपदक पटकावून त्यांच्या समर्थकांना जल्लोष साजरा करण्याची संधी दिली.
महाराष्‍ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने व महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने भोसरी येथे कै. पै. मारुती रावजी लांडगे क्रीडानगरीत आयोजित महाराष्‍ट्र केसरी व 57 वी राज्यस्तरीय वरीष्ठ गट गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. गादी आणि मातीवर प्रत्येक स्पर्धक पहिलवान त्यांची कर्तबगारी सिद्ध करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. परंतु याचदरम्यान कित्येकांचे आव्हानही संपुष्टात आले आहे. याचा पहिलाच शिकार ठरला सांगलीचा चंद्रहार पाटील. या स्पर्धेत त्याच्याकडून सर्वोत्कृष्ट प्रदर्शनाची अपेक्षा होती, परंतु पुण्याच्या पुण्याच्या सचिन येलभरने या अपेक्षेवर पाणी फिरवले. दोघांमध्ये वर्चस्वाची लढाई पेटली होती. गादी प्रकारात खेळताना चंद्रहारने 3 मिनिटांच्या पहिल्या फेरीत फं्रट सालतो मारण्याचा प्रयत्न केला. यात सचिन मैदानाबाहेर गेल्याने चंद्रहारला 1 गुण मिळाला. विश्रांतीनंतर दोघांनी आक्रमक खेळ केला. चंद्रहारचा हप्ता डाव सचिनने परतून लावला. त्यानंतर मात्र त्याने डावावर मजबूत पकड जमवली. सलग 2 गुणांची कमाई करत त्याने ही लढत 2 विरुद्ध 1 अशा फरकाने जिंकली आणि स्पर्धेत सर्वात मोठे उलटफेर केले. या उलटफेरासोबतच चंद्रहारचे तिस-यांदा महाराष्‍ट्र केसरी होण्याचे स्वप्नही भंगले. मात्र, डबल महाराष्‍ट्र केसरी असलेला मुंबईचा मल्ल नरसिंग यादवने उलटफेराची प्रक्रिया येथेच संपुष्टात आणली.
गादी प्रकारातील लढतीत त्याने सोलापूरच्या गोपीनाथ घोडकेला 7 गुणांनी पराभूत करून पुढच्या फेरीत प्रवेश केला. माती प्रकारातील अन्य एका लढतीत सोलापूरच्या समाधान घोडकेने पुण्याच्या सचिन मोहोळवर विजय मिळवला. पिंपरी चिंचवड संघाकडून अभिषेक फुगेने गादी प्रकारात परभणीच्या तनवीर शेखला 20 सेकंदांत अस्मान दाखवले, परंतु पुढच्याच फेरीत अभिषेकला उस्मानाबादच्या राहुल भांडवलकरने 9-2 ने पराभूत केले.
सुवर्ण कामगिरी
स्पर्धेच्या दुस-या दिवशी सकाळच्या सत्रात गादी प्रकाराच्या 66 किलो वजन गटात सोलापूरच्या महादेव कुसुमडेने पिंपरी-चिंचवडच्या संदेश काकडेला पराभूत करून सुवर्णपदकाची कमाई केली. यापूर्वी माती प्रकारात खेळताना त्याने सलग तीन वेळा सुवर्णपदक मिळवण्याची कामगिरी केली आहे. गादी प्रकाराच्या 55 किलो वजन गटात पुण्याच्या उत्कर्ष काळेने, तर माती प्रकाराच्या 55 किलो वजन गटात लातूरच्या शरद पवारने सुवर्णपदक पटकावले.