आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा प्रबोधिनींवर यंदा अकरा नियंत्रकांची नियुक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती -शिवछत्रपती क्रीडापीठ पुणे अन् अमरावतीसह राज्यातील 11 क्रीडा प्रबोधिनींच्या कामकाजावर नियंत्रणासाठी माजी ऑलिम्पियन, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असलेली उच्चस्तरीय धोरण समिती, कार्यकारी समिती तसेच देखभाल आणि व्यवस्थापन समित्यांची स्थापना केली आहे. या समित्या नियंत्रक म्हणून कार्य करणार आहेत, अशी माहिती राज्याचे क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी दिली.
उच्चस्तरीय धोरण समितीत माजी ऑलिम्पिक खेळाडू, विश्वविजेते किंवा या स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करणार्‍या राज्यातील दोन अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूंसह दोन शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि पुणे तसेच नागपूर येथील क्रीडा प्रबोधिनींच्या प्राचार्यांचा समावेश आहे. या सहाही सदस्यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी केली असून यानंतर अन्य खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे.
तिन्ही समित्यांची दर दोन महिन्यांतून एकदा बैठक होऊन राज्यातील खेळांच्या विकासाचा आढावा घेण्यात येईल. काही उणिवा आढळल्यास त्या दूर करण्याचे उपाय समितीद्वारे सुचवण्यात येतील. एखादा खेळाडू दर्जेदार कामगिरी करीत असल्यास त्याच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सहभागाबाबत विचार करण्यात येणार आहे. खेळ आणि खेळाडूच्या अनुषंगाने पारदर्शक निर्णय घेता यावेत. तसेच खेळाडूंना त्यांच्या पात्रतेनुसार योग्य संधी प्राप्त व्हावी, म्हणून या समित्या गठित केल्या आहेत.
राज्यातील खेळांचा स्तर उंचावण्यासोबतच प्रबोधिनी आणि क्रीडापीठाच्या कामकाजात एकसूत्रता असावी, तसेच कारभार पारदर्शक असावा, या उद्देशाने या समित्यांची स्थापना केली आहे. यात ज्यांना खरेच खेळाचे ज्ञान आहे, अशा खेळाडूची नियुक्ती केली आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी व्यक्त केली.
अंजली, काका समितीत
माजी ऑलिम्पियन, अर्जुन पुरस्कारप्राप्त नेमबाज अंजली भागवत, ख्यातनाम कुस्तीपटू काका पवार (शिवछत्रपती पुरस्कार), राष्ट्रकुल स्पर्धेत मध्यम पल्ल्याच्या शर्यतीत पदक जिंकणारी अ‍ॅथलिट कविता राऊत (शिवछत्रपती पुरस्कार), राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धा गाजवणारा जलतरणपटू वीरधवल खाडे (अर्जुन पुरस्कार)या क्रीडातज्ज्ञांची नियंत्रक समित्यांमध्ये नियुक्ती केल्यामुळे योग्य खेळाडूंना न्याय मिळण्याची आशा बळावली आहे.