आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Keshari Wrestling: Samadhan Ghodke Challenge Over

महाराष्‍ट्र केसरी कुस्ती स्पर्धा: समाधान घोडकेचे आव्हान संपुष्टात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी (पुणे)- हजारो कुस्तीशौकिनांच्या उपस्थितीत पार पडत असलेली महाराष्‍ट्र केसरी स्पर्धा आता हळूहळू अंतिम टप्प्याकडे सरकत आहे. जसेजसे एकेक निकाल बाहेर पडत आहेत तसतसा प्रेक्षकांचा उत्साहसुद्धा वाढतच चालला आहे. काल महाराष्‍ट्र केसरी स्पर्धेचा प्रबळ दावेदार समजला जाणारा चंद्रहार पाटील बाहेर पडताच आज स्पर्धेच्या दावेदारांपैकी एक असलेला समाधान घोडकेही स्पर्धेबाहेर पडला आहे. मुंबई उपनगरचा मल्ल सुनील साळुंकेने चारी मुंड्या चीत करून समाधानचे आव्हान संपुष्टात आणले.
कै. पै. मारुती रावजी लांडगे क्रीडानगरीत आयोजित महाराष्‍ट्र केसरी व 57 व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट, गादी आणि माती अजिंक्यपद स्पर्धेच्या तिस-या दिवशी अनेक दिग्गज पहिलवानांनी त्यांचे वर्चस्व पणाला लावले होते. दोन वेळा महाराष्‍ट्र केसरी पुरस्कार पटकावणा-या चंद्रहार पाटीलचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर कुस्तीशौकिनांना सोलापूरच्या समाधान घोडकेकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, समाधान समर्थकांच्या अपेक्षेस खरा उतरू शकला नाही. मुंबई उपनगरचा मल्ल सुनील साळुंकेने त्याला अस्मान दाखवत स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. गादी प्रकाराच्या 74 किलो वजन गटात अहमदनगरचा संतोष गायकवाड आणि कोल्हापूरचा रणजित नलावडेने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना मात देत आता सुवर्णपदकासाठी दावेदारी निश्चित केली आहे.
विजयी पहिलवान
माती प्रकाराच्या 74 किलो वजन गटात पुण्याच्या रवींद्र केरेने साता-याच्या जयदीप गायकवाडला 11-4 ने अस्मान दाखवत अंतिम लढतीत प्रवेश केला. बीडच्या विश्वंभर खैरेने अहमदनगरच्या अण्णा गायकवाडला 8-0 ने हरवत अंतिम फेरी गाठली. 60 किलो वजन गटात कोल्हापूरच्या विशाल मानेने कोल्हापूरच्याच सोनबा गोंगाणेसह अंतिम लढतीत प्रवेश केला आहे.
संतोष सुतारची घोडदौड सुरूच
माती प्रकाराच्या 96 किलो वजन गटातील दुस-या फेरीच्या एका लढतीत मुंबईचा मल्ल संतोष सुतारसमोर चिंचवडच्या प्रमोद मांडेरकराचे आव्हान होते, परंतु संतोषने डावपेचांचा लीलया उपयोग करत प्रमोदवर 8-0 ने विजय मिळवला. त्याने विजयी घोडदौड पुढे सुरू ठेवत तिस-या फेरीत प्रवेश केला.