आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Lost To Baroda In West Region One Day Series

वरिष्ठ गट पश्चिम विभागीय वनडे स्पर्धेत अंकितच्या शतकानंतरही महाराष्ट्र पराभूत, बडोद्याचा विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पश्चिम विभागीय वरिष्ठ वनडे क्रिकेट स्पर्धेत अहमदाबाद येथे झालेल्या दुसऱ्या लढतीत अंकित बावणेच्या शतकानंतरही महाराष्ट्राला बडोद्याकडून ७ गड्यांनी पराभूत व्हावे लागले.
महाराष्ट्राचा हा सलग दुसरा पराभव ठरला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने ४९.४ षटकांत सर्वबाद २४३ धावा केल्या. प्रत्युत्तरात बडोद्याने ४५.५ षटकांत ३ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. बडोद्याकडून सौरभ वाकासकरने ४२ धावा केल्या. त्याने दुसऱ्या विकेटसाठी दीपक हुडासोबत ६४ धावांची भागीदारी केली. दीपकने ८८ चेंडूंत ८८ धावा केल्या. त्याला काझीने बाद केले. भारतीय संघातून बाहेर असलेल्या युसूफ पठाणने नाबाद ८२ धावांची विजयी खेळी केली. हार्दिक पांडेने नाबाद २१ धावांचे योगदान दिले. महाराष्ट्राकडून समद फल्लाह, काझी शमशुद्दीन आणि निखिल पराडकरने प्रत्येकी एक गडी बाद केला.
अंकित बावणेने सावरला डाव
तत्पूर्वी, महाराष्ट्राचे आघाडीचे फलंदाज हर्षद खडीवाले (२२), विजय झोल (११) व रोहित मोटवाणी (४०) स्वस्तात बाद झाले. मागील रणजी हंगामात महाराष्ट्रासाठी खोऱ्याने धावा काढणाऱ्या अंकित बावणेने आपली लय कायम ठेवली. चौथ्या क्रमांकावर आलेल्या अंकितने नाबाद शतक झळकावत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. त्याने १२७ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार आणि ३ षटकार खेचत १०२ धावा काढल्या. त्यानंतर आलेल्या निखिल पराडकर (१), निखिल नाईक (१४), राहुल त्रिपाठी (८), शमशुद्दीन (६), अक्षय दरेकर (११), मुथास्वामी (१६) यांनी निराशा केली. बडोद्याकडून दीपक हुडा, कुणाल पांडे, युसूफ पठाणने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.